नांदेड जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी

कार्यालयाबाहेरच लोहा, कंधारमधील दोन पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली.
नांदेड जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी

नांदेड : येथील नवा मोंढा येथील जिल्हा काँग्रेस कार्यालयात राजकीय परिस्थितीचा व पक्षसंघटनेचा आढावा घेण्यासाठी प्रदेश युवक काँग्रेच्या वतीने निरीक्षण समितीने शुक्रवारी (दि.१ मार्च) बैठक घेतली. दरम्यान, कार्यालयाबाहेरच लोहा, कंधारमधील दोन पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली.

सदरील घटनाही वैयक्तिक कारणातून झाली असून, पक्षाशी याचा संबंध नसल्याचे पक्षनिरीक्षकांनी सांगितले. तसेच माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्यासोबत नांदेडसह भोकर, नायगाव, देगलूर आदी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते, पदाधिकारी भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे युवक काँग्रेसची कार्यकारीणी बरखास्त करण्यात आली असून लवकरच नवीन कार्यकारिणी गठित करण्यात येईल, असे पक्षनिरीक्षक अभिजीत चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षात गेल्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झाली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून प्रत्येक आठवड्यात एक एक समिती येऊन पक्षाचा आढावा घेत आहे. युवक काँग्रेसचे बरेच पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे युवक काँग्रेसची जिल्ह्यातील परिस्थिती पाहण्यासाठी पक्षनिरीक्षक अभिजीत चव्हाण, कपिल ढोके, ॲड. दीपक राठोड, अमोल जाधव, इम्रान सय्यद हे पाच जण नांदेड दौऱ्यावर आले होते. त्यांनी बैठक घेऊन नांदेड दक्षिण, उत्तरचा आढावा घेतला. बैठकीनंतर बाहेर आल्यानंतर पक्ष कार्यालयासमोरच लोहा तालुक्यातील आष्टूर येथील कमलाकर शिंदे व कंधारमधील बाबाराव बाबर यांच्या हाणामारी झाली. उपस्थित कार्यकर्त्यांनी सोडवणूक केली.

पुढील आठवड्यात नाना पटोले नांदेडमध्ये

उत्तर विधानसभा मतदारसंघातील विठ्ठल पावडे, विक्की राऊतखेडकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे युवक शहरची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. लवकरच नवीन कार्यकारणी गठित करण्यात येणार आहे. तसेच भोकर, नायगाव, देगलूरमध्येही नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे निरीक्षकांनी सांगितले. पप्पू कोंडेकर यांनी मराठा आरक्षणप्रश्नी चार महिन्यांपूर्वी पदाचा राजीनामा दिला असून, त्यांनी आपण पक्षासोबत असल्याचे सांगितले आहे. याशिवाय दुटप्पी भूमिका घेणारे, भाजपच्या कार्यक्रमाला जाणाऱ्यांची नोंद घेतली जात आहे. याशिवाय पुढील आठवड्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नांदेड दौऱ्यावर येणार आहेत, असे पक्षनिरीक्षक चव्हाण म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in