मालवण : सिंधुदुर्गमधील मालवण समुद्रकिनाऱ्यावरील राजकोट किल्ल्यावर नौदलाने उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा केवळ ८ महिन्यातच कोसळल्यानंतर राज्यातील जनतेमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच, सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही कलगीतुरा रंगला आहे. या घटनेच्या विरोधात बुधवारी ‘मालवण बंद’ची हाक देण्यात आली होती. तसेच महाविकास आघाडीने मालवणमध्ये मोर्चाचे आयोजन केले होते. हा मोर्चा राजकोट परिसरात पोहोचताच ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी दोन्ही गटातील महिलाही आक्रमक झाल्या होत्या. या गदारोळात राजकोट किल्ल्याच्या तटबंदीचेही नुकसान झाले.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार विनायक राऊत तसेच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा सहभाग असलेला महाविकास आघाडीचा मोर्चा राजकोट किल्ल्यावर दाखल होत असतानाच, त्याठिकाणी माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांच्यासह त्यांचे पुत्र, माजी खासदार निलेश राणे किल्ल्यावर दाखल झाले. दोन्ही कट्टर विरोधक आमनेसामने आल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांच्या वादात किल्ल्याच्या भिंतीवरील चिरे पडले. नेत्यांच्या दौऱ्यांच्या वेळांचे नियोजन करण्यात पोलीस यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याने ही परिस्थिती निर्माण झाली.
नारायण राणे आणि निलेश राणे चांगलेच आक्रमक झाले असताना राणे समर्थक आणि पोलिसांमध्येही बाचाबाची झाली. यावेळी निलेश राणे यांनी आक्रमक होत ‘ते बाहेरून येऊन अंगावर येणार का? त्यांना निघायला सांगा’, अशी भूमिका घेतली. भाजप आणि राणे समर्थकांनी मुख्य रस्ता अडवला. आदित्य ठाकरे यांनीही ‘गेलो तर मुख्य रस्त्यानेच जाणार,’ असा आक्रमक पवित्रा घेतल्याने राजकोट किल्ल्यावर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. ‘१५ मिनिटांत वाट मोकळी केली नाही, तर आम्ही किल्ल्यात घुसू,’ असा इशारा ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दिला. मात्र घोषणाबाजी आणि धक्काबुक्कीमुळे वातावरण अधिकच चिघळले. दोन्ही गटांमध्ये वादावादी सुरू असतानाच जयंत पाटील यांनी दोन्ही बाजूचे नेते आणि कार्यकर्त्यांची भेट घेऊन परिस्थिती निवळण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. राणे आणि ठाकरे समर्थकांकडून आव्हान-प्रतिआव्हान सुरू असल्याने पोलिसांकडून दोन्ही गटांना रोखण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र दोन्हीकडचे कार्यकर्ते पोलीस यंत्रणेला न जुमानता एकमेकांवर धावून गेले. यावेळी काही कार्यकर्त्यांना मारहाण झाली. तसेच किल्ल्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना निलेश राणे यांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक झाली. तर नारायण राणे यांनीही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दमदाटी केली. जवळतास दीड तास ठाकरे, अंबादास दानवे आणि वैभव नाईक यांनी किल्ल्याच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले. मात्र, यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन करत समजूत घातली. यानंतर आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, जयंत पाटील हे राजकोट किल्ल्यावरून बाहेर पडले.
भ्रष्टाचार, नाकर्तेपणा सगळं उघडं झालंय - जयंत पाटील
“येथे वाद निर्माण करण्याची गरज नव्हती. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यामुळे येथे वेगवेगळ्या पक्षाचे नेते येत आहेत. त्यांच्याशी स्थानिक नेत्यांनी वाद घालणे योग्य नाही. भ्रष्टाचार, नाकर्तेपणा हे सगळं उघडं झालंय, त्यामुळे सरकारची बाजू चिडलेली दिसते,” असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राणे व भाजपला लगावला.
चार दिवस खासदार कुठे होते? - आदित्य ठाकरे
खरं तर आज आपला मोर्चा होता. मात्र, या मोर्चामध्ये काही चिंधी चोर समोरून आले. आता श्रावण सुरू आहे, अन्यथा त्यांच्या खिशातून कोंबड्याही काढल्या असत्या. मी त्यांच्याकडे फारसे लक्ष देत नाही. हा त्यांचा बालिशपणा होता. ही घटना घडल्यानंतर येथील खासदार चार दिवसांनी आले. मग चार दिवस खासदार कुठे होते? ते आजच कसे आले?, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राणेंचा समाचार घेतला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, “त्या २४ वर्षांच्या मुलाला कंत्राट कुणी दिले? आपटेला पळून जाण्यास कुणी मदत केली? जसे भाजपवाल्यांनी रेवण्णाला पळून जायला मदत केली होती, तशीच यालाही केली का? याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांवर का गुन्हा दाखल झाला नाही? त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुश करण्यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी या पुतळ्याचे डिसेंबरमध्येच उद्घाटन केले. भाजपने गेल्या १० वर्षात केलेल्या सर्व कामांना गळती लागली. भाजपने केलेले असे कोणतेही काम नाही, त्या ठिकाणी गळती लागली नाही. अयोध्येतील राम मंदिर, नवीन संसद भवनाला गळती लागली. दिल्ली विमानतळाचे छत देखील कोसळले. महायुती सरकारने या पुतळ्याची जबाबदारी झटकली आहे. त्यांनी नौदलावर या घटनेचे खापर फोडले आहे. महाराष्ट्रात ज्या काही घटना होत आहेत, त्याला खोके सरकार कारणीभूत आहे,” अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
“आम्ही येत असताना कुठल्यातरी एका कॅमेरामनला धक्काबुक्की झाली आणि त्यापासून हा सर्व प्रकार सुरू झाला. मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे, महाराजांच्या किल्ल्यामध्ये आपण राजकारण करायचं नाही. म्हणूनच मी इथे सगळ्यांना अडवून धरले आहे. या बालिशपणात मला पडायचे नाही. त्यांची बुद्धी तेवढीच आहे. काही बालबुद्धीवाले नेते इकडे आले होते, उंची इतकीच त्यांची बुद्धी आहे,” असे सांगत आदित्य यांनी राणेंचाही समाचार घेतला.
आमच्या नेत्यांच्या केसांना धक्का लागला तर खबरदार - सुप्रिया सुळे
‘आमच्या नेत्यांच्या केसाला धक्का लागला तर खबरदार,’ असा इशारा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. पोलीस यंत्रणा याप्रकरणी काय करत आहे? आमचे सर्व नेते तिथे जाणार आहेत, हे सर्वश्रुत होते. मग सरकारची गुप्तहेर यंत्रणा काय करत आहे. गृहमंत्र्यांनी शांततेचे आवाहन केले पाहिजे. आमच्या सर्व नेत्यांची सुरक्षितता व जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारची आहे. आमच्या कोणत्याही नेत्यांच्या केसाला धक्का लागला तर पाहा काय होते ते. हे अतिशय चुकीचे आहे,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.