
जळगाव : राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचा वाहनचालक आणि स्थानिकांमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादावादीचे पर्यवसान हाणामारी आणि जाळपोळीत झाल्याने जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावात संचारबंदी जारी करावी लागली. याप्रकरणी सात जणांना अटक हाणामारी, जाळपोळ करण्यात आली असून हिंसाचारादरम्यान अनेक दुकानांना आग लावण्यात आली आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसानही करण्यात आले आहे. नववर्षाच्या रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर आता पाळधी गावात तणावपूर्ण शांतता असल्याचे सांगण्यात येत आहे.
गुलाबराव पाटील यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांना घेऊन जाणाऱ्या गाडीने धक्का दिल्याने पाळधी गावात मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर दोन गटात तुफान हाणामारी झाली. तसेच गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. गाडीचा धक्का लागल्याने पाळधी गावातील काही तरुणांनी चालकास शिवीगाळ केली. यावेळी वाहनात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी असल्याने शिवीगाळ करणाऱ्या तरुणांवर काही शिवसैनिक धावून गेले.
वाहने पेटवून दिली
सुरुवातीला दोन गटात शाब्दिक वाद झाला. मात्र, वाद इतका विकोपाला गेला की या वादाचे रुपांतर थेट हाणामारीत झाले. त्यानंतर काही समाजकंटकानी रात्री १ वाजताच्या सुमारास तीन ते चार वाहने पेटवून दिली. या घटनेची माहिती अग्निशमन दलालाही देण्यात आली. पण अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचेपर्यंत पेटवण्यात आलेली सर्व वाहने जळून खाक झाली होती. यावेळी पोलिसांनीही घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.