बैठकीत खडाजंगी; बीड ‘डीपीडीसी’मध्ये धस, मुंडे, सोनावणे भिडले, जिल्हा नियोजन समितीत अजितदादांचा सज्जड दम

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर गेल्या दीड महिन्यापासून बीड जिल्ह्यातील राजकारण राज्यभर धुमसत आहे.
बैठकीत खडाजंगी; बीड ‘डीपीडीसी’मध्ये धस, मुंडे, सोनावणे भिडले, जिल्हा नियोजन समितीत अजितदादांचा सज्जड दम
एक्स @ians_india
Published on

मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर गेल्या दीड महिन्यापासून बीड जिल्ह्यातील राजकारण राज्यभर धुमसत आहे. त्यातच पालकमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदाच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बीडमध्ये गुरुवारी खडाजंगी उडाली. खासदार बजरंग सोनवणे, भाजप आमदार सुरेश धस आणि अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांच्यात बाचाबाची झाली. मात्र, अजितदादांनी या सर्वांना सज्जड दम देत बीड जिल्ह्यासाठी चांगले काम करण्याच्या सूचना दिल्या.

सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्रिपदाच्या कार्यकाळातील कथित बोगस बिलांचा मुद्दा उपस्थित केला. तसेच बिंदू नामावली आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांविषयीही सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्र्यांसमोर भूमिका मांडली. परळीमध्ये ७३ कोटी ३६ लाख रुपयांची कामे दाखवून बोगस बिलांच्या आधारे पैसे उचलण्यात आल्याचा मुद्दा सुरेश धस यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित केला. त्याचवेळी बीड जिल्ह्याच्या बदनामीवरून मंत्री धनंजय मुंडे, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे यांच्यात खडाजंगी उडाली.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात धनंजय मुंडे पालकमंत्री होते. त्या काळात त्यांनी पालकमंत्रिपद भाड्याने दिले होते, असा आरोप धस यांनी केला होता. आता पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत आमदार सुरेश धस यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावर अजित पवार यांनी लेखी तक्रार देण्याची सूचना धस यांना केली. यावेळी बीड जिल्ह्याला बदनाम केले जात असल्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. त्यावर आमदार धस आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी कोण बदनाम करत आहे, असा सवाल केला. बीड जिल्ह्यात अधिकाऱ्यांवर कोणाची दहशत आहे हेही उघड करा, असा सवाल सुरेश धस आणि खासदार सोनवणे यांनी केला. यावरून पालकमंत्री अजित पवारांसमोर मंत्री मुंडे आणि सुरेश धस, बजरंग सोनवणे यांच्यात खडाजंगी झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनावणे,आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, आमदार नमिता मुंदडा, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार विजयसिंह पंडित उपस्थित होते.

माझे पांघरूण फाटून गेलेय - अजित पवार

काही दिवस तुमचे वागणे-बोलणे बघेन, सरड्यासारखे रंग बदलणारे काही असतात. उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे असतात. उद्या कुणी आले तर एवढ्या वेळेस पांघरूण घाला म्हटले तर जमणार नाही. पांघरूण फाटून गेलंय माझं.. एवढ्या वेळेस पदरात घ्या.. पदरच राहिला नाही माझा. चांगले वागा, तुमच्यामागे ताकद उभी करेन. चुकीचे वागलात तर कारवाई केली जाईल. शासनाच्या नियमाप्रमाणे कलम लावले जातील. मकोकाही लावला जाईल. बाहेरचे लोक येत आहेत, त्यांना जर कुणी खंडणी मागितली, रस्ते अडवले तर खपवून घेणार नाही, असा दम अजित पवार यांनी दिला.

पेनड्राइव्ह दिल्याने ५०० जण कोमात गेले - धस

अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम कार्यालयांतर्गत ७३ कोटी ३६ लाख रुपयांची कामे दाखवून बोगस बिलांच्या आधारे पैसे उचलण्यात आले. या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची सविस्तर माहिती असलेला पेनड्राइव्ह मी अजितदादांचे स्वीय सहाय्यक डिसले यांना बुधवारी रात्रीच दिला. पेनड्राइव्ह दिल्यापासून जिल्ह्यातील ५०० लोक कोमात गेले, असा दावाही आमदार सुरेश धस यांनी केला. त्यावर सविस्तर लेखी तक्रार द्या, अशी सूचना अजित पवार यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in