

मुंबई : अकरावी प्रवेशाची विशेष फेरी राबविण्याबाबत राज्यातील सुमारे ८०० विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याने शिक्षण संचालनालयाकडून मंगळवारी रात्री अचानक विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर केले. मात्र नवीन अर्ज करण्यासाठी दिलेल्या मुदतीमध्ये केवळ २५० विद्यार्थ्यांनीच अर्ज केले आहेत. त्यामुळे नवीन अर्ज व अर्जाचा दुसरा भाग भरण्यासाठी शिक्षण संचालनालयाने १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया राज्यभरात पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात आली. प्रवेशाच्या चार नियमित फेऱ्या व जवळपास नऊ विशेष फेऱ्या राबविण्यात आल्यानंतर ऑक्टोबरमध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली.
शिक्षण संचालनालयाने ८०० विद्यार्थ्यांकडून अकरावी प्रवेशासाठी आलेल्या अर्जाचे कारण देत ९ डिसेंबरला रात्री अचानक विशेष फेरी जाहीर केली. हे परिपत्रक संकेतस्थळावर जाहीर करत संचालनालयाने विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याच्या दृष्टीने कोणतेही पाऊल उचलले नव्हते. त्यामुळे ही फेरी नेमकी कोणासाठी राबविण्यात येत आहे, असा प्रश्न शिक्षक संघटनांकडून उपस्थित करण्यात आला होता.