

मुंबई : अकरावी प्रवेशापासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी शिक्षण संचालनालयाने अंतिम विशेष फेरी राबवली. या फेरीत राज्यभरातील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले. यापैकी सुमारे १०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नसल्याने या विद्यार्थ्यांना दूरध्वनी करून प्रवेशाबाबत विचारणा करण्याचा निर्णय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने घेतला आहे.
यंदा संपूर्ण राज्यात अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. प्रवेशाच्या विविध फेऱ्या राबवण्यात आल्या. यानंतरही प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक फेरी राबवण्याची मागणी राज्यभरातील पालकांनी केली होती. त्यानुसार शिक्षण संचालनालयाने १३ ते १७ डिसेंबर या कालावधीमध्ये विशेष फेरी राबवली. या फेरीत राज्यभरातून ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले. या फेरीला नवीन अर्ज करणे व भाग दोन भरण्यासाठी पहिल्या दिवशी फारच कमी प्रतिसाद मिळाल्याने अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर या अंतिम विशेष फेरीसाठी निवड यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कनिष्ट महाविद्यायलामध्ये प्रवेशाची संधी मिळाली त्यांनी प्रवेश निश्चित केले. या फेरीत प्रवेश मिळाल्यानंतरही काही विद्यार्थांनी महाविद्यालयात प्रवेश घेतले नाहीत. तर काही विद्यार्थांना महाविद्यालय मिळाले नाही.
विद्यार्थ्यांची यादी उपलब्ध करून देणार
अशा सुमारे १०० विद्यार्थ्यांना ८ ते १० जानेवारी या कालावधीत शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून संपर्क साधण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची विनंती करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांची यादी शिक्षण संचालनालयाकडून संबधित शिक्षण उपसंचालक कार्यालयाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या यादीनुसार संबंधित कार्यालयांना विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रतिसाद पाहून अकरावी प्रवेश प्रक्रिया बंद करण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.