
दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांची आता अकरावी प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. त्यादृष्टीने शिक्षण विभागाने अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्र जाहीर झाले आहे. ८ जूनपासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी आधीच प्रवेश अर्जाचा भाग एक भरला आहे, आता दहावीचा निकाल लागल्याने प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरायचा आहे.
अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ८ जून रोजी महाविद्यालयाचे पसंती क्रमांक भरता येणार आहेत. तर १९ जूनला प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रासाठी विद्यार्थ्यांना या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. मुंबई विभागात आतापर्यंत अर्जाचा भाग एक भरून एक लाख पंधरा हजार विद्यार्थ्यांनी अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी नोंदणी केली आहे.
ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक
८ ते १२ जून रात्री १० वाजेपर्यंत- नियमित पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविणे
१२ जून -प्रवेश अर्ज भाग दोन भरणे, मार्गदर्शन केंद्राकडून अर्ज प्रमाणित करणे
१३ जून -तात्पुरती पहिली गुणवत्ता यादी जाहीर करणे
१३ ते १५ जून - अर्ज भरताना चुका असल्यास दुरुस्तीसाठी आक्षेप नोंदविणे
१५ जून - अंतीम गुणवत्ता यादी तयार करणे
१९ जून सकाळी १० वाजता - पहिली गुणवत्ता यादी जाहीर
१९ ते २२ जून - विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे
२३ जून- दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे