Video : मतदान यंत्रे ठेवलेल्या गोदामामधले CCTVबंद; सुप्रिया सुळे यांची कारवाईची मागणी

बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर येथील मतदान यंत्रे ज्या गोदामात ठेवली आहेत, तेथील सीसीटीव्ही कॅमेरे सोमवारी सकाळी ४५ मिनिटे बंद पडले होते.
सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळेप्रातिनिधिक फोटो

प्रतिनिधी/मुंबई :
बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर येथील मतदान यंत्रे  ज्या गोदामात ठेवली  आहेत, तेथील सीसीटीव्ही कॅमेरे सोमवारी  सकाळी ४५ मिनिटे बंद पडले होते. मतदान यंत्रासारखी  अतिशय महत्वाची गोष्ट जेथे ठेवलेली आहे, तेथील सीसीटीव्ही  बंद पडणे ही बाब संशयास्पद आहे, अशी तक्रार बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी केली.

राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत आहे. ७ मे २०२४ रोजी बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले होते. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर येथील मतदान यंत्रे गोदामात  अतिसुरक्षा गृहात ठेवण्यात आली आहे.  मतदान यंत्रांवर  सीसीटीव्ही कॅमेराची नजर आहे. मात्र, येथील कॅमेरे बंद असल्याचे  उघडकीस आले.  सुप्रिया सुळे यांनी सोमवारी एक्स या समाज माध्यमातून ही बाब निदर्शनास आणली.  

 मतदान यंत्रे जेथे ठेवली आहेत तेथील सीसीटीव्ही बंद असणे  हा खूप  मोठा हलगर्जीपणा  आहे.याबाबत निवडणूक  प्रतिनिधींनी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाला संपर्क साधला असता समाधानकारक उत्तरे देण्यात आली नाहीत. याखेरीज सदर ठिकाणी तंत्रज्ञ  देखील उपलब्ध नाही. तसेच आमच्या प्रतिनिधींना मतदान यंत्राच्या  स्थितीची पाहणी देखील करु दिली जात नाही. हे अतिशय गंभीर असून  निवडणूक आयोगाने तातडीने याची दखल घेऊन सीसीटीव्ही  यंत्रणा का बंद पडली  याची कारणे जाहीर  करावीत . याखेरीज संबंधित घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर उचित कारवाई करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम  ठेवलेल्या गोडवूनमधील सीसीटीव्ही  ४३ मिनिटं बंद असल्याची माहिती ही धक्कादायक आहेच. पण काही गैरप्रकार करण्यासाठी तर जाणीवपूर्वक हा प्रकार केला नाही ना, अशी दाट शंका येते. ज्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर आवश्यक असते  त्याप्रमाणे ईव्हीएमच्या गोडावूनमध्येही सीसीटीव्ही  यंत्रणा सुरू असणे  आवश्यक आहे. निवडणूक आयोग कमी पडत असेल तर ही निवडणूक निष्पक्षपणे कशी म्हणता येईल? असा सवाल करत  या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in