

कराड : पाटणसह सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील सर्व तालुक्यांना गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अल्पावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले, अनेक रस्ते खचले, घाटमाथ्यावर दरडी कोसळल्या, तर कोयना धरणातून विसर्ग वाढविल्याने नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरणातून होणारा विसर्ग आणि नदीपात्रातील पावसामुळे कोयना नदीची पाणीपातळी धोकादायकरीत्या वाढली आहे. परिणामी संगमनगर (धक्का) येथील जुना पूल, पाटणजवळील मुळगाव पूल, निसरे बंधारा तसेच अनेक लहान पूल पाण्याखाली गेले असून नदीपलीकडील गावांचा संपर्क तुटला आहे. मुळगाव पुलावरून पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांना रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, कराड-चिपळूण राज्य महामार्गावरील सोनारखडी, येरफळे, म्हावशी, नवजा, नेरळे आणि सडावाघापूर परिसरात रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कायम असल्याने धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे. आवश्यकतेनुसार धरणातून होणाऱ्या विसर्गात आणखी वाढ करण्यात येऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. कोयना नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. नागरिकांनी नदीपात्र, ओढे, पूल आणि दरडप्रवण भागांपासून सुरक्षित अंतर ठेवावे. पाण्याखाली गेलेले पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. जनावरे, वाहने आणि शेतीची कामे करताना विशेष काळजी घ्यावी. प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.
अनंत गुरव, तहसीलदार
कोयनाचे सहाही वक्र दरवाजे तीन फुटांपर्यंत उघडले
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कायम असल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी धरणाचे सहाही वक्र दरवाजे टप्प्याटप्प्याने एक फुटावरून दोन आणि त्यानंतर तीन फुटांपर्यंत उचलण्यात आले. धरणातून सध्या १७ हजार ५८५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. १०५.२५ टीएमसी क्षमतेच्या धरणात ८७.८३ टीएमसी (८३.४५ टक्के) पाणीसाठा झाला असून ५९ हजार १९४ क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. गेल्या २४ तासांत धरणात तब्बल ३.०६ टीएमसी पाण्याची भर पडली आहे.