छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा १०० वर्षे टिकेल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन मालवणला नवीन पुतळ्याचे अनावरण

कोकणातील विविध प्रकारच्या वादळांना समर्थपणे तोंड देणारा हा पुतळा उभारला आहे. हा पुतळा जवळपास ९१ फुटांचा आहे. त्यात १० फुटांचा पेडेस्ट्रॉल आहे. हा देशातील महाराजांचा सर्वात उंच पुतळा आहे. या पुतळ्याच्या देखभालीचे काम...
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा १०० वर्षे टिकेल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
मालवणला नवीन पुतळ्याचे अनावरण
Published on

मालवण : मालवणमधील राजकोट येथे उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा १०० वर्षे टिकेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मालवणमधील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री नितेश राणे यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.

फडणवीस म्हणाले की, शिल्पकार राम सुतार यांनी उत्तम पुतळा तयार केला. कोकणातील विविध प्रकारच्या वादळांना समर्थपणे तोंड देणारा हा पुतळा उभारला आहे. हा पुतळा जवळपास ९१ फुटांचा आहे. त्यात १० फुटांचा पेडेस्ट्रॉल आहे. हा देशातील महाराजांचा सर्वात उंच पुतळा आहे. या पुतळ्याच्या देखभालीचे काम ज्यांनी पुतळा तयार केला, त्यांच्याकडे पुढील १० वर्षे राहणार आहे. त्यासंबंधीची हमी त्यांनी घेतली आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच तेजाने आणि त्याच स्वाभिमानाने अणि भव्यतेने उभा राहिला आहे. मागील काळात दुर्दैवी घटना घडली होती. त्यावेळी आमच्या सरकारने निर्धार केला होता की विक्रमी वेळेत आम्ही हा पुतळा पुन्हा प्रस्थापित करु, तो आम्ही पूर्ण केला. मी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिनंदन करतो. शिल्पकार राम सुतार यांनी अतिशय उत्तम दर्जाचा हा पुतळा तयार केला आहे. त्यांच्यासह आयआयटीचे इंजिनिअर, जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे तज्ज्ञही यांचे मार्गदर्शन घेण्यात आले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

कोकणातील वादळांचा पुतळा उभारताना विचार!

कोकणात वेगवेगळ्या प्रकारची वादळे येतात. तौक्ते, फयान यांसारख्या वादळांचा पुतळा उभारताना विचार करण्यात आला आहे. कितीही सोसाट्याचा वारा आला तरीही पुतळ्याला काहीही होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महाराजांना साजेसे स्मारक उभे करायचे हे ठरवले होते, त्यानुसार आता पुतळा उभा राहिला आहे, असे त्यांनी नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in