"स्वित्झर्लंडमध्ये घुमला 'जय जय महाराष्ट्र माझा'चा सूर; मुख्यमंत्र्यांनी शेअर केला गोड अनुभव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'एक्स'वर एक व्हिडिओ पोस्ट केला असून स्वित्झर्लंडमध्ये 'जय जय महाराष्ट्र माझा'चा सूर घुमल्याचे म्हटले आहे.
"स्वित्झर्लंडमध्ये घुमला 'जय जय महाराष्ट्र माझा'चा सूर; मुख्यमंत्र्यांनी शेअर केला गोड अनुभव

स्वित्झर्लंडमधील दावोस शहरात होणाऱ्या 'जागतिक आर्थिक परिषदे'साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिष्टमंडळासह काल रात्री रवाना झाले. स्वित्झर्लंडमध्ये मुख्यमंत्र्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्यांनी हा अनुभव सर्वांसोबत शेअर केला आहे. शिंदे यांनी 'एक्स'वर एक व्हिडिओ पोस्ट केला असून स्वित्झर्लंडमध्ये 'जय जय महाराष्ट्र माझा'चा सूर घुमल्याचे म्हटले आहे. यात ते तेथील मराठी माणसांसोबत महाराष्ट्र गीत गाताना दिसत आहेत.

"स्वित्झर्लंडमधील बृहन महाराष्ट्र मंडळाने अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले" असे शिंदे यांनी सांगितले. तसेच, स्वागत केल्यानंतर मंडळाने महाराष्ट्र गीत म्हणायला सुरुवात केली, यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्या स्वरात स्वर मिसळून महाराष्ट्र गीत गायला सुरुवात केली. या निमित्ताने स्वित्झर्लंडच्या भूमीत मराठी मातीचा सुगंध दरवळल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दावोस येथे महाराष्ट्राचे शिष्टमंडळ सहभागी होण्याची ही दुसरी वेळ असून गेल्या वर्षी या परिषदेत १ लाख ३७ हजार कोटींचे गुंतवणूक करार झाले होते. या परिषदेसाठी यंदाही भारताच्या दालनाच्या जवळ महाराष्ट्राचे अद्ययावत असे दालन (पॅव्हेलियन) उभारण्यात आले असून याठिकाणी मुख्यमंत्री हे सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करतील तसेच मुख्यमंत्री प्रमुख विदेशी उद्योगाच्या प्रमुखांशी देखील चर्चा करतील. यासाठी या दालनात बैठक कक्ष बनविण्यात आले आहेत. दुसरीकडे, वऱ्हाड निघालंय लंडनला सारखे हे वऱ्हाड दावोसला घेऊन जात असल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी शिंदेंना लगावला आहे. तर, दावोस दौऱ्यावर स्वतः खर्च करून निघालेल्या व्यक्तींची नावे जाहीर करा आणि महाराष्ट्राच्या शिष्टमंडळात त्यांची भूमिका, जबाबदारी काय असेल तेही स्पष्ट करा, असे थेट आव्हानही आदित्य यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in