
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकतेच अयोध्या दौऱ्यावरून महाराष्ट्रात परत आले. यावेळी विरोधकांनी त्यांच्या अयोध्या दौऱ्यावरून सडकून टीका केली. एकीकडे महाराष्ट्रातील शेतकरी अवकाळी पावसामुळे अडचणीत आला असताना मुख्यमंत्री शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर जाणे, कितपत योग्य आहे? असा सवाल विरोधकांनी केला. यानंतर आज महाराष्ट्रात परतल्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदेंनी पाहणी दौऱ्याला सुरुवात केली आहे. कारण, आज ते थेट बांधावर पाहणी करण्यासाठी गेल्याचे चित्र दिसून आले.
अयोध्या दौऱ्यावरून परत महाराष्ट्रात येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आपला पाहणी दौरा सुरु केला आहे. मुख्यमंत्री शिंदे आज नाशिकमधील सटाणा तालुक्यामध्ये दाखल झाले. इकडे त्यांनी गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची विचारपूस केली. तसेच, थेट शेताच्या बांधावर जाऊन त्यांनी झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री दादा भुसे होते. दरम्यान, राज्य सरकारने आता अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांसाठी पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून मंत्री अब्दुल सत्तारही अकोल्यातील पातुरमध्ये पाहणीसाठी गेले होते.