
आज प्रतापगडावर ३६३वा शिवप्रतापदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. पण, भाजप खासदार उदयनराजे भोसले अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या नाराजीची चर्चा सुरु झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी संबोधन करताना म्हणाले की, महाराष्ट्रात जर सत्ता परिवर्तन झाले नसते, तर आज शिवप्रताप दिनाला उत्साह दिसला नसता. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्याईने सगळ्या गोष्टी घडल्या. तसेच, त्यांनी यावेळी प्रतापगडावरील काढण्यात आलेल्या अतिक्रमणावरही भाष्य केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसला जाणार नाही; मुख्यमंत्री शिंदेंचा विश्वास
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांकडे एक आदर्श राजा म्हणून पाहिले जाते. शिवरायांच्या अनेक मावळ्यांनी प्रतापगडावरील अतिक्रमण निघाले पाहिजे, ही मागणी होती. कायद्याने, नियमाने काम करण्याचे धाडस काही लोक दाखवत नव्हते. पण ते अतिक्रमण काढून टाकायचा निर्णय झाला. पोलिस व प्रशासनाचे आभार मानतो. एकही कॅबिनेट अशी झाली नाही ज्यामध्ये सर्वसामान्यांचा निर्णय झाला नाही. शिवरायांचे साक्ष देणारे प्रसंग पुढे नेल्याशिवाय राहणार नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रतापगडावरील अतिक्रमण काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली. शिवाजी महाराजांचा इतिहास कोणालाही पुसता येणार नाही. शिवरायांची साक्ष देणारा प्रत्येक विषय राज्य सरकार पुढे नेल्याशिवाय राहणार नाही."
"मी शेतकऱ्याचा मुलगा, शेतकरी हेलिकॉप्टरने शेती करायला जाऊ शकत नाही का?"
"देशात हेलिकॉप्टरने शेतात जाऊन शेती करणारा मुख्यमंत्री दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा," अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली होती. ठाकरे यांच्या या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याने काहींचा पोटशूळ उठला आहे, अशी टीका करतानाच शेतकरी हेलिकॉप्टरने शेती करायला जाऊ शकत नाही का? असा संतप्त सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना म्हणाले की, "एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र मागे पडतो आहे. उदय सामंत यांना उद्योग मंत्री म्हणून काम करताना मी कधीच पाहिलेले नाही. राज्य सरकारने त्यांना या संपूर्ण प्रक्रियेतून बाहेर ठेवले आहे. उदयिंग खात्याशी संबंध नसणारेमी, जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांना मी आव्हान दिले होते. तुम्ही प्रसारमाध्यमांच्या मंचावर या आणि माझ्यासमोर डिबेट करा"