Eknath Shinde
Eknath Shinde

हे आरक्षण टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं, हा मराठा समाजाचा विजय - मुख्यमंत्री

विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयकाला एकमताने मंजुरी दिली गेली असून १० टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. या आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
Published on

मुंबई : विधिमंडळात सुरु असलेल्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयकाला एकमताने मंजुरी दिली गेली असून १० टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. या आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. शिंदे यावेळी म्हणाले, मी जेव्हा मराठा आरक्षण देण्याची शपथ घेतली तेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतलं. मराठा समाजासाठी इच्छापूर्तीचा ऐतिहासिक दिवस आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न देता हे आरक्षण दिलं गेलं आहे. हे आरक्षण टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आहे. हा मराठा समाजाचा विजय आहे.

शिंदे सभागृहात पुढे म्हणाले की, हे आरक्षण कोर्टात टिकणारच. आंदोलनकर्त्यांवरील किरकोळ गुन्हे मागे घेतले आहेत. आंदोलनकर्त्यांनी विश्वास ठेवावा. अधिसुचनेवर सहा लाख हरकती आल्या आहेत. घाईघाईने कोणतीही अधिसूचना अंतिम करणे चुकीचं ठरु शकतं. याबाबत आढावा घेऊन सर्व गोष्टींची छाननी करुनच निर्णय घेतला जाईल. मराठा समाजातील मागासलेल्या लोकांवर अन्याय होऊ नये म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. आरक्षणासाठी जे लोक आंदोलन करत आहेत, त्यांच्याबाबत सरकार कोणताही दुजाभाव करत नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावं. ओबीसी समाजावर अन्याय न करता सरकारने आरक्षण देण्याचा हा निर्णय घेतला आहे.

मराठा आरक्षण देण्याची शपथ घेतल्यानंतर तीन महिन्यांच्या आत आरक्षण दिलं. त्यामुळे ज्या लोकांच्या मनात गैरसमज आहेत, ते त्यांनी दूर करावेत. मी दिलेला शब्द पाळतो म्हणून लोक माझ्यावर विश्वास ठेवतात. मी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा कार्यकर्ता आहे. हा विजय मनोज जरांगे पाटील यांचा आहे, असंही शिंदे म्हणाले.

मराठा समाजाने पाच-सहा महिन्यात अनेक आंदोलनं केली. पण काही आंदोलनं शांततेत न होता त्यांना गालबोट लागलं. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला देखील या लोकांची जाणीव आहे. हा मराठा ऐक्याचा आणि आंदोलनाचा हा विजय आहे. आंदोलनाला गालबोट लागायला नको होतं. मराठा समाजाला न्याय देतोय याचा आनंद होत आहे. आम्ही बोलते ते करतो, हे जरांगेंसाठी आवाहन आहे. प्रशासनाची कुठलीही जातपात नसते. प्रशासन लोककल्याणासाठी काम करतं, असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं.

logo
marathi.freepressjournal.in