"लाडकी बहीण अर्जासाठी पैसे मागितले तर जेलमध्ये टाकणार..." मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा

"लाडकी बहीण योजनेसाठी जे कुणी पैशाची मागणी करतील, त्यांना जेलमध्ये टाकण्यात येईल," असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे संग्रहित फोटो

मुंबईः महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन मुंबईतील विधानभवनात सुरु आहे. यादरम्यान अजित पवार यांनी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. दरम्यान सध्या राज्यभरामध्ये या योजनेसाठी अर्ज भरण्याचा प्रक्रिया सुरु असून काही ठिकाणी अर्जासाठी पैशांची मागणी करण्यात येत असल्याचं समोर आलं होतं. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना कुणी पैशाची मागणी करत असल्यास त्याला जेलमध्ये टाकलं जाईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

पैसे मागितल्यास जेलमध्ये टाकणार...

मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "एकही रुपया सरकारच्या माध्यमातून घेतला जाणार नाही. कोणीही कुणाला पैसे देता कामा नये. जे कुणी पैशाची मागणी करतील, त्याची तक्रार कलेक्टरकडे करावी. त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. त्याला जेलमध्ये टाकण्यात येईल. जे कुणी अधिकारी, कर्मचारी महिला भगिनींकडून पैशाची मागणी करतील, अशा लोकांना माझा इशारा आहे. कुठल्याही परस्थितीत सर्वसामान्य महिला भगिनींना याचा लाभ मिळाला पाहिजे."

काय आहे लाडकी बहीण योजना-

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलेला तिच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर दीड हजार रुपये रक्कम दरमहा दिली जाणार आहे. महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्पोटित, परित्यक्त्त्या आणि निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा जास्त नसेल तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

logo
marathi.freepressjournal.in