मुख्यमंत्री म्हणतात महाराष्ट्राच्या 'या' दोन जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी; नेमकं प्रकरण काय?

मुख्यमंत्री म्हणतात महाराष्ट्राच्या 'या' दोन जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी; नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्राच्या दोन जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आणि देशभर याची चर्चा झाली
Published on

महाराष्टातील चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यानंतर सर्व देशभर याची चांगलीच चर्चा झाली. मुंबईतील एका कार्यक्रमामध्ये ते म्हणाले की, "महाराष्ट्रात सोन्याचे दोन ब्लॉक आहेत, याची माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. आमच्या सरकारच्या काळात हे सोने निघाले, तर ती राज्यासाठी खूप मोठी उपलब्धी असेल. अशा प्रकारच्या खाणी आढळून आल्या तर, देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्प येथे सुरू केला जाऊ शकतो." असा विश्वास त्यांनी दर्शवला आहे.

खरंच महाराष्ट्रामध्ये सोन्याची खाण आहे का?

१० वर्षांपूर्वी एका झालेल्या एका संशोधनानुसार, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोळशाच्या खाणी आहेत. याशिवाय गोंडपिपरी तालुक्याच्या भूगर्भात मौल्यवान प्लॅटिनम, सोने आणि दुर्मिळात दुर्मिळ म्हणून ओळखले जाणारे रूथेनियम, रेडिअम, इरेडिअम धातू असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. २००७ ते २०१०मध्ये करण्यात आलेल्या एका सर्व्हेमध्ये हे उघड झाले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, "महाराष्ट्र राज्य हे नैसर्गिक साधन संपत्तीच्या बाबतीत अतिशय समृद्ध असून राज्याच्या सकल उत्पन्नात मोलाची भर घालण्याची क्षमता या क्षेत्रात आहे. राज्यातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्ती दडलेली असून तिचा खाण उद्योगात वापर होणे गरजेचे आहे." मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या खान क्षेत्रातील संधी गुंतवणुकीच्या परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे खनिकर्म मंत्री दादा भुसे आदी मान्यवर उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in