Pune : पेपर फुटल्यास दहा हजारांची नुकसानभरपाई द्यावी; कॉकरोच जनता पार्टीची मागणी

एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकातून वगळलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी साम्राज्याचा नकाशा’ पुन्हा समाविष्ट करण्यात यावा, यासह अन्य मागण्यांचे ठराव कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात गुरुवारी मांडण्यात आले.
Pune : पेपर फुटल्यास दहा हजारांची नुकसानभरपाई द्यावी; कॉकरोच जनता पार्टीची मागणी
Pune : पेपर फुटल्यास दहा हजारांची नुकसानभरपाई द्यावी; कॉकरोच जनता पार्टीची मागणी(Photo-X/@Cockroachisback)
Published on

पुणे : परीक्षेचा पेपर फुटल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला शासनाकडून दहा हजार रुपये आर्थिक नुकसानभरपाई मिळावी, परीक्षा आयोजित करण्यासाठी निविदा घेणाऱ्या कंपन्यांचे कडक ऑडिट व्हावे, मंत्र्यांच्या नातलगांना वा जवळच्या मित्रांना अशा निविदा मिळता कामा नयेत तसेच एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकातून वगळलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी साम्राज्याचा नकाशा’ पुन्हा समाविष्ट करण्यात यावा, यासह अन्य मागण्यांचे ठराव कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात गुरुवारी मांडण्यात आले.

विद्यार्थ्यांचा एकच आवाज; शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आज, युवा एकता झिंदाबाद, अशा घोषणा देत ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या बॅनरखाली एकवटलेल्या हजारो विद्यार्थी व युवकांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परिसर गुरुवारी दणाणून सोडला.

‘नीट’ परीक्षेतील पेपरफुटी आणि सीबीएसई परीक्षांमधील गोंधळावरून देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या वतीने अभिजीत दीपके आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी. अॅड असीम सरोदे, नामदेवराव जाधव यांच्यासह पुण्याच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मंडळींनी सहभाग घेतला. त्याचबरोबर विद्यार्थी, विद्यार्थिनीही यात मोठ्या संख्येने सहभागी झाले.

विद्यार्थ्यांसह ज्येष्ठांचाही लक्षणीय सहभाग

दुपारी चारच्या सुमारास आंदोलनाला सुरुवात झाली. विद्यार्थी, विद्यार्थिनींबरोबरच ज्येष्ठांचाही यातील सहभाग उठून दिसत होतात. विद्यार्थ्यांच्या हातात असलेल्या फलकांवरील मजकूर प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होता. पेपर लीक सरकार, लीक इन इंडिया, आमचे भविष्य आमचा अधिकार, सर्वांना शिक्षण, सर्वांना काम, असा आशय या फलकांवर लिहिलेला होता. या वेळी विद्याथ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पहाटेचा शपथविधी कोणत्या घटनेत?

अभिजीत दीपके यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. आम्हाला राज्यघटना माहीत आहे का, असेही ते विचारतात. मात्र, चोरून पहाटेचा शपथविधी पार पाडणे कोणत्या राज्यघटनेत लिहिले आहे, असा टोलाही दीपके यांनी लगावला.

logo
marathi.freepressjournal.in