

छत्रपती संभाजीनगर: परीक्षा आणि भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारांविरुद्ध सुरू असलेले आंदोलन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देईपर्यंत थांबणार नाही असा निर्धार कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी रविवारी व्यक्त केला. "धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर, आम्ही शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी एक अजेंडा तयार करू. हे इथेच थांबणार नाही, कारण बेरोजगारी हा देशातील एक मुख्य मुद्दा आहे." असेही त्यांनी नमूद केले.
दीपके रविवारी सकाळी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एमआयडीसी वाळूज परिसरात असलेल्या आपल्या घरी पोहोचले. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेले आंदोलन मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले असून, त्यात सुमारे ७,००० लोकांनी सहभाग घेतला होता. असा दावा त्यांनी केला. "आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केलेली नाही. हे आंदोलन 'जनरेशन झेड'साठी आहे. ज्यांना आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे, ते बाहेरून पाठिंबा देऊ शकतात, पण आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करणार नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले.
नीट पेपर फुटीचा फटका मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना बसला असून, याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे, असे स्पष्ट करून ते म्हणाले की, "जर कोणीही जबाबदारी घेत नसेल, तर व्यवस्था कार्यक्षमतेने काम करू शकणार नाही. जर एखाद्या कंपनीला कोणामुळे नुकसान होत असेल, तर जोपर्यंत ती व्यक्ती राजीनामा देत नाही, तोपर्यंत ते नुकसान नफ्यात रूपांतरित होईल का?"
सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, खासगी कंपनीत दोन चुकांनंतर कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकले जाते, परंतु इथे सरकारद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे पेपर वारंवार फुटत आहेत. "जोपर्यंत राजीनामा निश्चित होत नाही, तोपर्यंत सरकार आपली चूक मान्य करायला तयार आहे, यावर आम्ही कसा विश्वास ठेवायचा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
"गेल्या १०-१२ वर्षांत देशाचे राजकारण हिंदू-मुस्लिम अजेंड्याकडे वळल्याचे आपण पाहत आहोत. या मुद्द्यामुळे तरुणांना रोजगार मिळणार नाही. आपल्याला हे लक्ष विचलित करून सरकारचे प्राधान्यक्रम बदलले पाहिजेत," असा टोला त्यांनी हाणला.
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची तुलना शेजारील देशांमध्ये झालेल्या निदर्शनांशी केली जाऊ शकत नाही, असा दावा करून ते म्हणाले की, ही केवळ जनरेशन झेडची चळवळ असून ती कोणत्याही राजकीय पक्षाशी ती संबंध ठेवणार नाही. दिपके म्हणाले की, "कॉकरोच" या शब्दावरून सुरू झालेली ही चळवळ, शेजारील देशांतील आंदोलनांशी तुलना करण्यासारखी नाही. "कारण, इथे (भारतात) एक व्यवस्था आहे. ज्यांना वाटते की आमचे आंदोलन शेजारील देशांतील आंदोलनांसारखे आहे, त्यांनी हे लक्षात घ्यावे की जंतरमंतरवरील आंदोलन अत्यंत शांततापूर्ण होते.
आंदोलनावर टीका करणाऱ्यांना सवाल
शनिवारच्या आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर दीपके यांनी सवालांची फैर झाडली. ते म्हणाले....
"जंतरमंतरवरील प्रचंड गर्दी आणि छायाचित्रे लोकांचे वास्तव सांगत आहेत. तुम्ही किती लोकांना पाकिस्तानी म्हणणार? आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना, विरोधी पक्षांना आणि प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना तुम्ही पाकिस्तानी म्हणणार का? सत्ताधारी पक्षांचे 'आयटी सेल'चे लोकच फक्त भारतीय आहेत का?"
“देवेंद्र फडणवीस यांनी बोलण्यापूर्वी विचार केला पाहिजे, कारण ते उत्तर प्रदेशचे नाही तर महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री आहेत. माझ्याकडे डॉ. आंबेडकरांचा फोटो असलेले एक पुस्तक आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेत्याला (फडणवीस) असे म्हणायचे आहे का की आंबेडकरांचा फोटो दाखवणे म्हणजे अराजकता आहे? त्यांच्या मते 'जय भीम'चा नारा देणे ही अराजकता आहे का?"