मुंबई : भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी झाल्यानंतर घटक पक्ष म्हणून राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत महायुतीच्या एकत्रित सभा घेण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबई विभागीय मेळावा येत्या ७ जानेवारीला षण्मुखानंद सभागृहात आणि त्यानंतर १२ जानेवारीला प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आल्याची माहितीही तटकरे यांनी दिली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महिला आर्थिक विकास मंडळाच्या सभागृहात राष्ट्रवादीच्या प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर विचारमंथन आणि पक्षाची भविष्यातील वाटचाल, यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. पक्षातील विविध पदांच्या नियुक्त्या, बुथ कमिट्या नियुक्ती, याशिवाय जिल्ह्याची देण्यात आलेली जबाबदारी याबाबतची माहिती अजित पवार यांनी घेतली. तसेच आगामी काळात महिला, विद्यार्थी, युवतींसाठीही मेळावे घेणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेतून वेगवेगळी वक्तव्ये
‘‘काही प्रसिद्धीसाठी हपापलेले लोक स्वतःच्या महत्त्वाकांक्षेपोटी पक्षाच्या भूमिकेबद्दल वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत. येणाऱ्या काळात एनडीएचा घटक पक्ष म्हणून महायुतीसोबत निवडणूक लढवत असताना निवडणूक आयोगाचा निकाल आमच्या बाजूने लागेल, या अपेक्षेसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून पक्षाच्या चिन्हावर आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. हा निर्णय आमचा पूर्वीच झाला आहे, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.