फुले दांपत्याला भारतरत्न पुरस्कार, विधानसभेत ठराव मंजूर

क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा ठराव पणनमंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत मांडला.
फुले दांपत्याला भारतरत्न पुरस्कार, विधानसभेत ठराव मंजूर
Published on

मुंबई : क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा ठराव पणनमंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत मांडला. जयकुमार रावल यांनी मांडलेला ठराव सोमवारी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. दरम्यान, महात्मा ही जनतेने दिलेली पदवी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान केला, तसा भारतरत्न पुरस्कार महात्मा गांधी यांना का देत नाही, असा सवाल उपस्थित करत छगन भुजबळ यांनी जयकुमार रावल यांच्या ठरावाला पाठिंबा दिला.

क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी उपेक्षित, वंचितांच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश निर्माण करत, सामाजिक न्यायासाठी आयुष्य खर्ची घालून, अस्पृश्यता निवारण आणि स्त्री शिक्षणासाठी संघर्ष केला. त्यामुळे महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्याच्या प्रयोजनार्थ हा ठराव मांडला आहे. भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून राजकारण, कला, साहित्य आणि विज्ञान क्षेत्रातील विचारवंत, शास्त्रज्ञ, उद्योगपती, लेखक आणि समाजसेवक यांना या पुरस्काराने गौरविण्यात येते. क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्याची शिफारस केंद्र शासनाकडे करण्यात येणार असल्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी सभागृहात सांगितले.

“महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्या अपूर्व कार्याद्वारे समाजात आगळे स्थान निर्माण केले आहे. महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव मंजूर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा,” अशी सूचना विधानसभेत कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

केंद्र सरकारला शिफारस करणार!

क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्यात येत असून ठराव एकमताने संमत करण्यात आल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in