मुंबई : मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवीन पुतळा बसवण्याच्या कामाला वेग आला आहे. यासाठी राज्य सरकारने अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली ९ जणांची समिती स्थापन केली आहे. नवीन पुतळ्याची संकल्पना, कामाचा वाव व कार्यपद्धती निश्चिती करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारने समितीला दिले आहे. याबाबतचा अध्यादेश शुक्रवारी जारी करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले राजकोट येथे भारतीय नौदल दिनाचे औचित्य साधून ४ डिसेंबर २०२३ रोजी भारतीय नौदलाने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र २६ ऑगस्ट २०२४ रोजी पुतळ्यास दुर्घटना झाली. या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले. महाविकास आघाडीसह शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला. विविध पक्षांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यभर आंदोलन केले. या घटनेनंतर महायुतीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली. अखेर नवीन पुतळा बसविण्याची घोषणा राज्य सरकारने केली.
या दुर्घटनेत बाबत मुख्यमंत्री अध्यक्षतेखाली २८ ऑगस्ट २०२४ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्याबाबत निर्णय घेण्यात आला. नवीन पुतळ्याच्या कामाचा वाव, संकल्पना, कार्यपध्दती निश्चितीसाठी शिफारशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि ९ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
अशी असेल समिती
मनीषा पाटणकर-म्हैसकर - अध्यक्ष
सदाशिव साळुंखे, सचिव (रस्ते) - सदस्य
कमांडर एम. दोराईबाबू, नौदलाचे प्रतिनिधी - सदस्य
प्रा. जांगीड, ३० वर्षाचा स्ट्रक्चरल इंजीनिअरींगचा अनुभव, आय.आय.टी - सदस्य
प्रा. परीदा, मेटलर्जी इंजीनिअरींग व मटेरियल सायन्सचा अनुभव, आय.आय.टी. - सदस्य
राजीव मिश्रा, संचालक, जे. जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चर - सदस्य
राजे रघुजी आंग्रे, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज व मराठा आरमाराचे (Navy) अभ्यासक - सदस्य
जयसिंगराव पवार, इतिहासकार - विशेष निमंत्रित इतर विशेष निमंत्रित