

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या प्रस्तावाला राज्यभरातील विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध असून, सरकारने हा निर्णय तातडीने रद्द करून परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाइनच घ्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या रोहित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत केली. दरम्यान, ऑनलाईन परिक्षेचा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
एमपीएससी परिक्षा ऑफलाईन घेण्यासंदर्भात रोहित पवार यांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी पवार म्हणाले की, राज्यात सुमारे ५० लाख विद्यार्थी एमपीएससीच्या परीक्षांची तयारी करत आहेत. काही दिवसांपूर्वी एमपीएससीने जारी केलेल्या परिपत्रकात आगामी परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. देशातील विविध ऑनलाइन परीक्षांमध्ये पेपरफुटी, गैरप्रकार आणि तांत्रिक अडचणींची अनेक उदाहरणे आहेत. त्याउलट गेल्या २०-२५ वर्षांत एमपीएससीने घेतलेल्या ऑफलाइन परीक्षांमध्ये पेपरफुटीची एकही घटना घडलेली नाही. त्यामुळे ऑनलाइन परीक्षांऐवजी ऑफलाइन पद्धत कायम ठेवणे अधिक विश्वासार्ह ठरेल.
रोहित पवार यांनी नॉर्मलायझेशन, पेपरफुटीचा धोका तसेच विद्यार्थ्यांना दूरवर परीक्षा केंद्र मिळण्याच्या समस्याही मांडल्या. छत्रपती संभाजीनगर, वर्धा आणि अमरावतीसह विविध भागांत विद्यार्थ्यांनी या निर्णयाविरोधात आंदोलने केली आहेत. त्यामुळे सरकारने ऑनलाइन परीक्षेचा निर्णय मागे घेतला नाही तर विद्यार्थी आणि लोकप्रतिनिधी एकत्र येऊन एमपीएससी आणि सरकारविरोधात मोठे आंदोलन उभारण्यात येईल.