
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जनमत चाचणी घेण्याची मागणी करून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विदर्भवाद्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला. नागपुरात भाजप नेत्यांच्या भेटी घेतल्याने पुन्हा भाजप-मनसे युतीच्या चर्चेला तोंड फुटले. अपेक्षेप्रमाणे ठाकरे यांनी यासंदर्भातील संभ्रम कायम ठेवला.
महापालिकांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणीसाठी राज ठाकरे यांनी विदर्भाचा दौरा केला. त्यांच्या दौऱ्यात जाहीर सभा किंवा तत्सम कार्यक्रमांचा समावेश नव्हता. नागपूर, चंद्रपूर व अमरावती येथे त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सध्या मरणासन्न असलेल्या पक्षात प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला. अनेक वर्षांनंतर ठाकरे या भागात आले. त्यामुळे कार्यकर्त्यांना काय संदेश देतात, पक्षबांधणीसाठी काही कार्यक्रम देतात काय? या भागातील प्रश्नांवर ते काय बोलणार, याबाबत उत्सुकता होती. पक्ष स्थापनेला १६ वर्षे होऊनही नागपुरात पक्षाचे अस्तित्वच दिसत नाही, याची स्पष्ट कबुली ठाकरे यांनी दिली. कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घ्यावेत, असा कानमंत्र त्यांनी अमरावतीत दिला. केवळ पदे घेऊन जागा अडवून बसणाऱ्यांना यापुढे मनसेत स्थान असणार नाही. जो पक्षासाठी काम करेल, तोच पदावर राहील, असा इशाराही दिला.
स्वतंत्र विदर्भ राज्य मागणीच्या चळवळीत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी उडी घेतल्याने सध्या हा मुद्दा विदर्भात ऐरणीवर आहे. या मुद्यावर राज यांची भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. विदर्भ राज्यासाठी जनमत चाचणी घ्या, असे सांगून ठाकरे यांनी विदर्भवाद्यांच्या जखमेवर मीठ चोळले.