
पेण - गणेशोत्सव पार पडल्यानंतर पहिल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पेण तालुक्यात साजरा करण्यात येणाऱ्या साखरचौथ गणेश उत्सवापूर्वी पेण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सार्वजानिक गणेश मंडळांची बैठक पार पाडण्यात आली. या बैठकीत कायदा व सुव्यवस्था राखून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न करता साखरचौथ गणेशोत्सव आनंदात पार पाडा अशा प्रकारच्या सूचना पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी दिल्या आहेत.
कायदा व सुव्यवस्था राखा,मिरवणुकीदरम्यान वाहतुकीस अडथळा येऊ देऊ नका, धार्मिक,राजकीय तेढ निर्माण होईल असे चलचित्र आणि मिरवणुकीत गाणी लावू नका, आपल्या मिरवणुकीत आपलेच सदस्य सहभागी राहतील याची खबरदारी घ्या, पाण्याचा प्रवाह असेल तर खोल पाण्यात विसर्जन करण्यासाठी उतरू नका, मिरवणुकीची वेळ रात्री दहा वाजेपर्यंत राहील, आपल्या मागील मंडळाची मिरवणूक पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा करून द्या आदी प्रकारच्या सूचना आज पेण पोलिस ठाण्यात उपस्थित असणाऱ्या गणेश मंडळाच्या अध्यक्ष तसेच सदस्स्यांना पेण पोलिसांमार्फत देण्यात आल्या आहेत. यावेळी सर्व मंडळांनी देखील नियमांचे पालन करून शांतता व सुव्यवस्था राखून आणि प्रशासनाने लादून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून आम्ही हा उत्सव पार पाडू असे आश्वासन देण्यात आले.