EVM वरून रणकंदन! निवडणूक पद्धतीत बदल करा - पवार; ईव्हीएमचे रडगाणे बंद करा -शिंदे, पवारसाहेबांनी पराभव स्वीकारावा - फडणवीस

विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाल्यानंतर ईव्हीएमवरून राज्यातील वातावरण तापले आहे. त्यातच ईव्हीएमविरोधात सर्वप्रथम लढा पुकारणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावातून हा वणवा आता पेटू लागला आहे.
 शरद पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (डावीकडून)
शरद पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (डावीकडून)
Published on

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाल्यानंतर ईव्हीएमवरून राज्यातील वातावरण तापले आहे. त्यातच ईव्हीएमविरोधात सर्वप्रथम लढा पुकारणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावातून हा वणवा आता पेटू लागला आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी मारकडवाडी गावाला भेट देऊन सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढत निवडणूक पद्धतीत बदल करण्याची मागणी केली. त्यानंतर सत्ताधारी महायुतीकडूनही जोरदार पलटवार करण्यात आला आहे.

मारकडवाडी गावात मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदान घेण्याच्या निर्णयाबद्दल माळशिरसचे राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांच्यासह १०० हून अधिक ग्रामस्थांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विरोधी पक्ष ईव्हीएमविरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्याच्या तयारीत असतानाच, शरद पवार यांनी रविवारी मारकडवाडीला भेट देऊन तिथूनच लाँग मार्चला सुरुवात केली. त्यावेळी शरद पवारांसमोरच उपस्थित मारकडवाडीमधील महिलांनी शासनाविरोधात एल्गार पुकारला.

“लोकसभा, राज्यसभेत अनेक खासदारांमध्ये फक्त मारकडवाडीचीच चर्चा आहे.तुमच्याच गावात तुम्हालाच जमावबंदी, हा कुठला कायदा? मारकडवाडीच्या आंदोलनामुळे ईव्हीएमविरोधात देश पेटून उठत आहे. तुम्हा सर्व ग्रामस्थांचे याबद्दल मी अभिनंदन करतो. निवडणुकीच्या निकालावरून लोकांच्या मनात शंका निर्माण झाल्या आहेत. अमेरिकेसारख्या मोठ्या देशात बॅलेट पेपरवर मतदान होते, अनेक देशांनी ईव्हीएमचा त्याग केला आहे. त्यामुळे देशातही निवडणूक पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज आहे,” अशी मागणी शरद पवारांनी यावेळी केली.

“जगातील मोठा देश अमेरिका. पण तिथेही मतपेटीतच मत टाकले जाते. दुसरा मोठा देश इंग्लंड. तिथेही मत मतपेटीत टाकले जाते. युरोप खंडातील सर्व देश आपल्यासारखे ईव्हीएमवर मतदान घेत नाहीत. अमेरिका आणि काही देशांनी ईव्हीएमचा निर्णय घेतला. पण नंतर त्यांनी हा निर्णय बदलला. मग भारतातच निवडणुका ईव्हीएमवर का? आता आपणही निवडणूक पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.

“आज जगात कुठेही ईव्हीएमचा वापर होत नाही. मग भारतातच याचा वापर का सुरू आहे. आज तुमच्या गावाने एका वेगळ्या पद्धतीने जायचे ठरवले तर सरकारने तुमच्याविरोधात खटला भरला. माझी तुम्हाला विनंती आहे की, तुमच्यावर दाखल करण्यात आलेल्या खटल्याची सर्व माहिती मला द्या. याबाबतची तक्रार आम्ही राज्याचा निवडणूक आयोग, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडे करू,” असेही शरद पवार म्हणाले.

माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनीही ईव्हीएमवर शंका घेत राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. “निवडणूक आयोगाकडून पत्र घेणार असून येत्या दोन दिवसांत मी आमदारकीचा राजीनामा देणार आहे. बॅलेट पेपरवर पोटनिवडणूक निवडणूक घ्या, अशी विनंती आम्ही निवडणूक आयोगाला करणार आहोत. आयोगाने परवानगी दिली नाही, तर सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. आमच्यावर प्रशासनाने दबाव वाढवला, तेव्हा आदल्या दिवशी रात्री गावामध्ये लोक मंडपात झोपले होते. सकाळी मतदानाच्या दिवशी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राहुल गांधी यांनी याबाबत माहिती घ्यायला गावात प्रतिनिधी पाठवले होते. माझ्या शपथेपेक्षा येथील लढाई महत्त्वाची आहे,” असे जानकर म्हणाले.

सरकार का घाबरत आहे? - जयंत पाटील

या भागातून निवडून आलेले आमदार उत्तमराव जानकर यांना लाखांचे मताधिक्य मिळाले असते, पण तसे झाले नाही. तसेच मारकडवाडी येथे विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात शंका आहे. संपूर्ण महाराष्ट्रालाच या निकालांवर शंका आहे. निकाल लागला आहे, पुढे न्याय मिळेल की नाही माहिती नाही. पण भारतीय घटनेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला बोलण्याचा अधिकार दिला आहे. मारकडवाडीच्या ग्रामस्थांची इच्छा आहे की त्यांना बॅलेटवर मतदान करून काय खरे, काय खोटे हे बघायचे आहे. मग पोलीस अधिकारी का थांबवत आहेत? सरकार का घाबरत आहे? यातून पुन्हा शंका निर्माण होत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

रडीचा डाव बंद करा - एकनाथ शिंदे

आपल्या बाजूने कोणताही निकाल लागला तर, सर्वोच्च न्यायालयापासून निवडणूक आयोगापर्यंत सर्व चांगले ठरतात. विरोधात निकाल गेला तर, सर्वोच्च न्यायालयावरही विरोधकांनी आक्षेप घेतला, आरोप केले. हे लोकशाहीसाठी घातक आहे. त्यामुळे हे रडगाणे थांबवा, असे माझे विरोधकांना आवाहन आहे. कोणाला काही वाटले म्हणून कोणी काहीही (बॅलेटवर मतदान) निर्णय घेऊ शकतो का? लोकशाहीमध्ये नियम ठरलेले आहेत. निवडणूक आयोग आहे, संविधान आहे. लोकांनी दिलेला कौल मान्य करून त्याचे स्वागत केले पाहिजे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पवारांनी पराभव स्वीकारावा - फडणवीस

पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी आपला पराभव स्वीकारला पाहिजे. पवार साहेबांनी जनतेचे मत स्वीकारले पाहिजे. लोकशाही प्रक्रियेवरून लोकांचा विश्वास उठेल, अशाप्रकारची कृती किमान शरद पवारांनी करू नये. किंबहुना शरद पवार यांनी जनतेचे ऐकावे, कार्यकर्त्यांचे आणि त्यातल्या त्यात खोटे सांगणाऱ्या कार्यकर्त्यांचे ऐकू नये, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

निवडणूक घेण्याचे अधिकार आयोगाला - जिल्हाधिकारी

लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ नुसार कोणालाच मतदान घेण्याचे अधिकार नाही. जर ग्रामस्थांना निकालावर संशय असेल तर ते कोर्टात निवडणूक याचिका दाखल करू शकतात. पण स्वतःला मतदान घेता येणार नाही. मतदान घेण्याचे अधिकार हे नियमानुसार केवळ निवडणूक आयोगाला आणि त्यांच्या वतीने प्रशासनाला अधिकार आहेत, असे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट केले. मारकडवाडी प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापू लागल्यानंतर आशीर्वाद यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाची बाजू मांडली. पोलीस नीट काम करत नाहीत म्हणून स्वतःचे तुरुंग किंवा पोलीस दल सुरू करता येत नाही. त्याच पद्धतीने स्वतः असे मतदान घेता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in