खातेवाटपावरून धुसफूस; भाजपसाठी शिंदे आता ‘कामापुरतेच’! नगरविकास खात्यावरच बोळवण, पाठिंबा देणाऱ्या अजितदादांना अर्थ खाते

राज्याच्या राजकारणात शिवसेना फोडून महायुतीची सत्ता आणण्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका निभावणारे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपला आता फक्त ‘कामापुरते’च हवे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
खातेवाटपावरून धुसफूस; भाजपसाठी शिंदे आता ‘कामापुरतेच’! नगरविकास खात्यावरच बोळवण, पाठिंबा देणाऱ्या अजितदादांना अर्थ खाते
Published on

राज्याच्या राजकारणात शिवसेना फोडून महायुतीची सत्ता आणण्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका निभावणारे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपला आता फक्त ‘कामापुरते’च हवे असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदेंना आता उपमुख्यमंत्रीपदावरच समाधान मानावे लागणार असून नव्या मंत्रिमंडळात अर्थ आणि गृह खात्यासाठी त्यांनी आग्रह धरला असला तरी केवळ ‘नगरविकास’वरच त्यांची बोळवण होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. विधानसभेचा निकाल लागून २० दिवस उलटले असले तरी खातेवाटपावरून धुसफूस सुरू आहे. त्यामुळे महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अद्याप होऊ शकलेला नाही. दरम्यान, शनिवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे.

फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर नाराजीमुळे एकनाथ शिंदे यांनी आपले दरे हे मूळ गाव गाठले होते. मात्र, याचवेळी अजित पवारांनी भाजपला पाठिंबा देत शपथ घेण्याचे जाहीर केल्याने शिंदेची कोंडी झाली आहे. तर अजितदादांना पुन्हा एकदा अर्थ खात्याची बक्षिसी मिळणार असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले. दरम्यान, आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एकनाथ शिंदे यांना नाराज न करण्यासाठी आणखी काही आमीषे दाखवली जातील, असेही बोलले जाते.

भाजपला १३२ जागा मिळाल्याने भाजप सत्तेत बसणार, हे ओळखून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी भाजपला तत्काळ पाठिंबा जाहीर करत एकनाथ शिंदे यांची ‘विकेट’च काढली. त्यामुळे निकालानंतर मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसलेल्या एकनाथ शिंदे यांना भाजपने ‘साईड ट्रॅक’ला टाकले आहे. मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळणार नाही, हे लक्षात आल्यावर गृहखाते मिळण्यासाठी शिंदे यांनी दबावतंत्राचा वापर केला. मात्र एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री करत पूर्वीच्या नगरविकास खात्यावर त्यांची बोळवण करण्यात येणार भाजपला जाहीर पाठिंबा देणारे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थ खात्याची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. तर एकनाथ शिंदे यांची अवस्था ‘गरज सरो, वैद्य मरो’ अशी झालेली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान, मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार, यावर बातम्यांमध्ये चर्चा आहे. प्रत्यक्षात महायुतीचे खातेवाटप अद्याप ठरलेले नाही. महायुतीचे ठरू द्या, नंतर बघू, असे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी ‘दैनिक नवशक्ति’शी बोलताना सांगितले.

भाजप कोणत्याही परिस्थितीत गृहमंत्रीपद सोडणार नाही, हे माहिती असूनही शिंदे यांनी याच पदाचा आग्रह धरला. त्यामुळे आता खातेवाटपात कोणाच्या वाटेला कोणती खाती येणार, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

यांचा पत्ता कट

महायुतीच्या अडीच वर्षांच्या कालावधीत काही मंत्र्यांनी वादग्रस्त विधाने केली. त्यामुळे महायुतीवर टीकेची झोड उठली होती. पुन्हा एकदा महायुतीला जनतेने एकहाती सत्ता स्थापन करण्याचा बहुमान दिला आहे. मात्र, गेल्या अडीच वर्षांतील चूक पुन्हा नको, असा पवित्रा भाजपने घेतला आहे. त्यामुळे वादग्रस्त विधाने करणारे तानाजी सावंत, गुलाबराव पाटील, संजय राठोड, दीपक केसरकर आदींचा पत्ता कट होणार असल्याचे समजते.

मंत्रिमंडळात कोण हे ठरू द्या - संजय शिरसाट

मंत्रिमंडळात कोण हे अद्याप ठरलेले नाही. महायुतीचे प्रमुख नेते आणि केंद्रीय नेतृत्व यावर निर्णय घेणार आहेत. गृहखाते कोणाकडे याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. एक-दोन दिवसांत यावर निर्णय होईल, असे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले.

महायुतीचे नेते आणि केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल - बावनकुळे

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते आणि आमचे केंद्रीय नेतृत्व चर्चा करून समन्वयाने योग्य निर्णय घेतील. आम्ही जनतेला जाहीरनाम्यातून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास आमचे सध्या प्राधान्य आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

फडणवीस - अजितदादा दिल्लीत, शिंदेंनी जाणे टाळले

मंत्रिमंडळात कोणत्या नेत्यांना संधी द्यायची, याबाबतची चर्चा महायुतीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दिल्लीला रवाना झाले. विशेष म्हणजे, दिल्लीतील बैठकीला एकनाथ शिंदे यांनी जाणे टाळल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. फडणवीस यांनी दिल्लीत पोहोचल्यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यानंतर बुधवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी या प्रमुख नेत्यांची चर्चा झाली. आता हे नेते राज्यात परतल्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा बैठक घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करून अंतिम शिक्कामोर्तब करणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in