मुंबई : राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणारे तालिबानीवृत्तीचे असून राहुल गांधी यांचा अपमान कदापी सहन करणार नाही. राहुल गांधी यांच्याविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्यांना महायुतीच्या नेत्यांनी लगाम घालावा, असा इशारा देत भाजपविरोधात काँग्रेसने राज्यभरात आंदोलन केले.
मीरा-भाईंदर येथे प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सतेज बंटी पाटील, हुसेन दलवाई, आमदार भाई जगताप यांच्यासह नेते, पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करत भाजपच्या तालिबानीवृत्तीचा निषेध केला. मुंबईत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुलाबा येथीस घरासमोर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे निलंबन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रवींद्र धंगेकर, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागपूरमध्ये माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजीत वंजारी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलन करून वाचाळवीरांचा निषेध करत कारवाई करण्याची मागणी केली. नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीनेही आंदोलन करून वाचाळवीरांचा निषेध केला. कोल्हापूर काँग्रेस कमिटीनेही आंदोलन करून धमक्या देणाऱ्यांचा धिक्कार केला.
नाशिकमध्ये ‘जोडे मोरो’ आंदोलन
नाशिक जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शिरीष कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली बाजार समिती गेटवर शिवसेना आमदार संजय गायकवाड, भाजप नेते अनिल बोंडे, तरविंदर सिंग मारवाच्या प्रतिमेला जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी बाजार समिती सभापती संजय जाधव, शहर अध्यक्ष नंदकुमार कोतवाल यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संभाजीनगरात रास्ता रोको
छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोके आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शेख युसूफ, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश सरचिटीस जितेंद्र देहाडे, जगन्नाथ काळे, योगेश मसलगे, इब्राहिम पठाण, किरण पाटील डोणगावकर, भाऊसाहेब जगताप यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.