गुणरत्न सदावर्तेंविरोधात काँग्रेस आक्रमक ; देवेंद्र फडणवीस यांना केलं मोठं आव्हान

काँग्रेसकडून सदावर्ते यांच्या अटकेची मागणी केली जात आहे.
गुणरत्न सदावर्तेंविरोधात काँग्रेस आक्रमक ; देवेंद्र फडणवीस यांना केलं मोठं आव्हान

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रपीता महात्मा गांधी यांचा खून करणाऱ्या नथुराम गोडसे विषयी केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेससह पुरोगामी संघटना आक्रमक झाल्या आहेत. काँग्रेसकडून सदावर्ते यांच्या अटकेची मागणी केली जात आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खुनी अतिरेकी नथुराम गोडसेचा उदो उदो करण्याची प्रवृत्ती देशात बळावत चालली आहे. नथुराम गोडसे (Nathuram Godse) हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खुनी आहे हे जगजाहीर असताना त्याचे गुणगान गाण्याची हिम्मत फक्त भारतीय जनता पक्षाचे सरकार असतानाच होते. गुणरत्न सदावर्ते नावाच्या एका विकृत इसमाने स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या वार्षिक अहवालावर नथुराम गोडसेचा फोटो छापून उदात्तीकरण केले आहे. या विकृत इसमाला तात्काळ बेड्या ठोकण्याची हिंमत गृहमंत्री फडणवीस यांनी दाखवावी, असं आव्हान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी दिले आहे.

गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या वक्तव्यसंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, गुणरत्ने सदावर्ते हा व्यवसायाने वकील असलेला इसम सातत्याने भडाकाऊ विधाने करत असतो, सामाजिक वातावरण गढूळ करण्याचे काम करतो. महात्मा गांधींबद्दल देखील हा इसम गरळ ओकत असतो. आज याने राष्ट्रपीता महात्मा गांधींचा खुनी नथुराम गोडसेचा फोटो स्टेट ट्रान्सपोर्ट को- ऑपरेटिव्ह बँकेच्या अहवालावर छापून महात्मा गांधी यांचा अपमान केला. असं लोंढे म्हणाले.

“गांधी यांचा विचार आता शिल्लक राहिलेला नाही” असं म्हणत सदावर्तेने नथुरामचे गुणगान गायले. सदावर्ते या इसमाच्या मागे कोणाची शक्ती आहे, त्याचा बोलविता धनी कोण आहे, हे महाराष्ट्राला माहित आहे. राष्ट्रपित्याचा अपमान काँग्रेस पक्ष सहन करणार नाही. जेव्हा जेव्हा भाजपाचे सरकार असते तेव्हा तेव्हा नथुरामाच्या औलादी डोके वर काढत असतात. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदावर्तेवर कडक कारवाई करून महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे हे दाखवून द्यावे. असं आव्हान देखील लोंढे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं.

ते म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावानेच भारताची जगात ओळख आहे, गांधींच्या नेतृत्वाखालीच भारताने बलाढ्य ब्रिटिशांना भारत सोडण्यास भाग पाडलं, अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले हेच काही लोकांना व संघटनांना पचनी पडत नाही. महात्मा गांधी यांचा अपमान भारतीय जनता पक्ष, त्यांच्या सहकारी संस्था व त्यांच्याशी सलंग्न व्यक्ती सातत्याने करत असतात, अशा प्रवृत्तींना धडा शिकवणे गरजेचे आहे. सरकार याची गंभीर दखल घेऊन कडक कारवाई करेल अशी अपेक्षा आहे, असंही अतुल लोंढे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in