महाराष्ट्रात काँग्रेसही झाली सक्रिय; आज मुंबईत बैठक, लोकसभेच्या १९ मतदारसंघांचा घेणार आढावा

आगामी लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय पक्षांच्या हालचाली वेगात सुरू झाल्या असून, भाजपसोबत आता काँग्रेसनेही बैठकांचे सत्र सुरू केले आहे.
महाराष्ट्रात काँग्रेसही झाली सक्रिय; आज मुंबईत बैठक, लोकसभेच्या १९ मतदारसंघांचा घेणार आढावा

विशेष प्रतिनिधी/मुंबई

आगामी लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय पक्षांच्या हालचाली वेगात सुरू झाल्या असून, भाजपसोबत आता काँग्रेसनेही बैठकांचे सत्र सुरू केले आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप होण्याआधीच काँग्रेसने मंगळवारी मुंबईत १९ मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत १९ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार असून, तयारीच्या दृष्टीने चर्चा केली जाणार आहे. मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघ वगळून १९ मतदारसंघांतील आढावा घेतला जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. एकीकडे भाजप निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी करीत आहे. मात्र, महाविकास आघाडी जागावाटपाच्याच प्रश्नांत गुंतलेली आहे. आता काँग्रेसने निवडणुकीच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. अद्याप जागावाटप झाले नसले तरी मुंबईतील ६ जागा वगळता राज्यातील जवळपास १९ जागांवरील पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी मुंबईत बोलावली आहे. या बैठकीत मतदारसंघनिहाय तयारी आणि तेथील स्थिती आणि रणनीतीवर चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व आहे.

काँग्रेसचे राज्यात चांगले बळ आहे. त्यातल्या त्यात विदर्भात काँग्रेसची ताकद मोठी आहे. त्यामुळे विदर्भातील नागपूर, गडचिरोली, रामटेक, चंद्रपूर, गोंदिया-भंडारा, अमरावती, अकोला, यवतमाळ-वाशिम यासह १९ मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे. या बैठकीला या मतदारसंघातील प्रदेश सरचिटणीस, आजी-माजी आमदार, सर्व जिल्हाध्यक्ष आणि विविध आघाड्यांचे प्रमुख, जिल्हा पातळीवरील पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे मंगळवारी १९ जिल्ह्यातील आजी-माजी आमदारांसह पदाधिकारी हजेरी लावणार आहेत. या बैठकीत प्रदेश काँग्रेसच्या वतीने प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार असून, आणखी काय तयारी करायला हवी, याबाबत मते जाणून घेतली जाणार आहेत. त्यामुळे आता काँग्रेसही निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे. मात्र, अशा परिस्थितीत जागावाटपाचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागावाटपाचा तिढा बुधवारी सुटणार?

दरम्यान, महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सोडविण्यासाठी शरद पवार यांनी ६ मार्च रोजी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला वंचित आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत जागावाटपाचा तिढा सोडविला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासोबतच या बैठकीत महाविकास आघाडी किती मजबुतीने उभी राहते, याचाही अंदाज येणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

logo
marathi.freepressjournal.in