औरंगाबादच्या नामांतराला कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा विरोध

औरंगाबादमधील कॉंग्रेसच्या शहराध्यक्षांसह अल्पसंख्याक आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
औरंगाबादच्या नामांतराला कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा विरोध

‘मविआ’ सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर केल्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. कॉंग्रेसची हायकमांडही याबाबत नाराज असल्याचे सांगण्यात आले. या नामांतराच्या निषेधार्थ औरंगाबादमधील कॉंग्रेसच्या शहराध्यक्षांसह अल्पसंख्याक आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला विरोध न केल्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आता उघड नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी थेट सोनिया गांधी, राहुल गांधींकडे तक्रार करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, औरंगाबादमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही या नामांतराविरोधात उपोषण केले औरंगाबाद कॉंग्रेसचे नेते इब्राहीम पठाण यांनी सांगितले की, ‘आमचे एक शिष्टमंडळ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, नेते राहुल गांधी, मलिकार्जुन खरगे आणि कॉंग्रेस प्रभारींच्या भेटीसाठी लवकरच जाणार आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्यास विरोध केला होता. मात्र, मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी कुठलीही भूमिका घेतली नाही. नामांतराच्या ठरावाला विरोधदेखील केला नाही. त्यामुळे या मंत्र्यांची पूर्वीची वक्तव्ये, त्यासंदर्भातील बातम्या वरिष्ठांना दाखवून आम्ही या मंत्र्यांची तक्रार करणार आहोत. मराठवाड्यातील मुस्लीम समाजात फसवल्याची भावना निर्माण झाली असून त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.’ नामांतरावरुन कॉंग्रसचे शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. तो अजून मंजूर झालेला नाही. उस्मानी यांनी सांगितले की, औरंगाबाद या नावाला इतिहास आहे. ऐतिहासिक वास्तूंचे पर्यटन शहर म्हणून औरंगाबादची ओळख आहे.

ही ओळख मिटवता कामा नये. त्यामुळे अनेक पदाधिकारी दिल्लीत जाऊन काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे नामांतराबाबत विरोध दर्शवत आहेत. आघाडी सरकारच्या ‘किमान समान कार्यक्रमा’त संभाजीनगर हा विषय नव्हता. मात्र, तरीही नामांतर करण्यात आले. त्यामुळे न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई आम्ही लढणार असल्याचे उस्मानी यांनी सांगितले.

मतदार दुरावण्याची भीती

काँग्रेसचे सचिव आणि युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मुझफ्फर खान यांनी सांगितले की, नामांतराच्या निर्णयामुळे मुस्लीम समाजात नाराजी आहे. मुस्लीम समाज कॉंग्रेसचा परंपरागत मतदार आहे. मात्र, नामांतराच्या निर्णयामुळे कॉंग्रेसला निवडणुकीत फटका बसू शकतो. ज्या मुद्यांवर सरकार स्थापन झाले, त्यामध्ये संभाजीनगर हा मुद्दा नव्हता. शिवसेनेने जाताना केवळ स्वत:च्या मतांसाठी नामांतराची खेळी केली. याला काँग्रेसने विरोध करणे गरजेचे होते. लवकरच दिल्लीला जाऊन याची माहिती देणार असल्याचे मुझफ्फर खान यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या औरंगाबादमधील पदाधिकाऱ्यांनीही या नामांतराला विरोध दर्शवला असून त्याविरुद्ध उपोषण केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in