मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करण्यात आला तसेच काम निकृष्ठ दर्जाचे असल्यामुळे तो कोसळला. परिणामी महायुती सरकारने महाराष्ट्राच्या अस्मितेलाच धक्का दिला असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. मालवणमध्ये घडलेल्या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करून नैतिक जबाबदारी स्विकारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
मालवण येथील घटनेच्या विरोधात काँग्रेस पक्षाने आंदोलन करुन भाजपा युती सरकारचा निषेध केला. कराडमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कॉग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. युवक काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष शिवराज मोरे, तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
कोल्हापुरमध्ये काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादी शहराध्यक्ष आर. के. पोवार, शिवसेना उपनेते संजय पवार, शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे, तौफिक मुल्लाणी यांच्यासह कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
जळगाव येथे प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे, शहर काँग्रेस अध्यक्ष शाम तायडे यांच्या नेतृत्वाखाली सरकारचा निषेध केला. ह्या आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नाशिक येथे शहर काँग्रेस अध्यक्ष अँड आकाश छाजेड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश सचिव राहूल दिवे, युवक काँग्रेसचे राहुल पाटील, सुदेश आण्णा मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करून महायुती सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला.
‘बेजबाबदारीचा जाब विचारणार’
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या पुतळ्याची पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाची एवढी घाई का करण्यात आली. तसेच या घटनेशी संबंधित सर्व अधिकारी, कंत्राटदार व इतर यंत्रणेच्या बेजबाबदारीचा जाब या आंदोलनाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना विचारण्यात येणार आहे. यासह पक्षाच्यावतीने सर्व राज्यभरात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी स्थानिक पातळीवर आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आल्याचे ते म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी पाटील यांनी थेट घटनास्थळी जाऊन याविरोधी आंदोलनाचा पुकारा दिला आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्याजवळ ते हे आंदोलन करणार आहेत.