काँग्रेस सर्वात भ्रष्ट पक्ष, त्यांना गणेश पूजेचाही तिरस्कार; वर्ध्यामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसच्या मानगुटीवर विद्वेषाचे भूत बसले असून ते गणपती पूजेचाही तिरस्कार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
काँग्रेस सर्वात भ्रष्ट पक्ष, त्यांना गणेश पूजेचाही तिरस्कार; वर्ध्यामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
एएनआय
Published on

वर्धा : शहरी नक्षल, फुटिरतावादी शक्ती, तुकडे तुकडे गँग यांच्यामार्फत काँग्रेस चालवली जात असल्याचा आरोप करतानाच, काँग्रेस हा सर्वात भ्रष्ट पक्ष असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. काँग्रेसच्या मानगुटीवर विद्वेषाचे भूत बसले असून ते गणपती पूजेचाही तिरस्कार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

‘पंतप्रधान विश्वकर्मा’ योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त वर्धा येथे आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. मोदी यांनी देशाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या निवासस्थानी भेट देऊन गणपतीची पूजा केली होती. यावरून काँग्रेस पक्षाने मोदी यांच्यावर टीका केली होती. या टीकेला मोदी यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, मी गणपती पूजेसाठी गेलो त्यावरही काँग्रेसने आक्षेप घेतला. त्यांना गणपती पूजेचाही तिटकारा आहे.

यावेळी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षावरही मोदी यांनी निशाणा साधला. गणपतीच्या पूजेवरून काँग्रेस माझ्यावर टीका करीत असताना महाराष्ट्रातील त्यांचे मित्र पक्ष मूग गिळून गप्प बसले होते. गणपती बाप्पाचा अपमान त्यांनी सहन केला, असे ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यातील शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका बसला होता. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या कसा विरोधात आहे, यावर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला. काँग्रेसने शेतकऱ्यांचा वापर नेहमीच राजकीय फायद्यासाठी आणि भ्रष्टाचारासाठी करून घेतला आहे, असा आरोप करून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या काँग्रेसला सत्तेत येण्याची आणखी एक संधी देता कामा नये़, असे ते म्हणाले. ‘पंतप्रधान विश्वकर्मा’ योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पोस्टाच्या तिकिटाचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रा’लाही मोदी यांनी भेट दिली. शिवाय महिलांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप’ योजनेचीही घोषणा मोदी यांनी यावेळी केली़ यवतमाळ येथे १००० एकर परिसरात पसरलेल्या ‘पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपेरल पार्क’ उभारण्यात येत आहे़ या पार्कची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आली.

काँग्रेसचा अजेंडा भारतविरोधी

राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील वक्तव्याचा संदर्भ देत परदेशात भारतविरोधी अजेंडा चालवला जात असल्याचा आरोप मोदी यांनी काँग्रेस पक्षाचे थेट नाव न घेता केला़ परदेशात जाऊन आरक्षणविरोधी आणि शीख समुदायासंदर्भात विधाने केली जात आहेत़ ही कृती जगासमोर देशाला मान खाली घालायला लावण्यासारखी आहे, असे ते म्हणाले.

कर्नाटकात देवाला व्हॅनमध्ये बंद केले

मी गणपतीच्या पूजेला गेलो यावर काँग्रेस पक्षाने टीका केली़ मात्र, कर्नाटकमध्ये जिथे काँग्रेस सत्तेत आहे, तिथे गणपती बाप्पाला पोलिसांच्या व्हॅनमध्ये बंद करून ते ठेवतात़ यावरून काँग्रेस या थराला गेला आहे की त्याला गणपतीची पूजा केली तरी तिरस्कार वाटतो़ काँग्रेसचे हे तुष्टीकरणाचे राजकारण आहे.

logo
marathi.freepressjournal.in