सांगलीत काँग्रेसची नाराजी कायम! मविआच्या मेळाव्यावर बहिष्कारास्त्र; काँग्रेस नेते नागपुरात

सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील (ठाकरे गट शिवसेना) यांच्या प्रचारार्थ सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात महाविकास आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला. त्यामुळे या मेळाव्यात काँग्रेस नेते सहभागी होतील आणि मतदारसंघात पुन्हा एकजुटीने प्रचाराला लागतील, अशी आशा होती.
सांगलीत काँग्रेसची नाराजी कायम! मविआच्या मेळाव्यावर बहिष्कारास्त्र; काँग्रेस नेते नागपुरात

विशेष प्रतिनिधी/मुंबई

सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्राबल्य असताना महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळाली असून, त्यांनी डबल केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. मात्र, मविआच्या बैठकीत निर्णय होण्याआधीच ही उमेदवारी घोषित झाल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त करतानाच ही जागा काँग्रेसलाच मिळाली पाहिजे, असा आग्रह कायम धरला. परंतु महाविकास आघाडीने ही जागा शिवसेनेलाच दिली. तथापि, अजूनही जिल्ह्यातील काँग्रेस नेते नाराज असून, सांगलीत महाविकास आघाडीचा मेळावा आयोजित केला असताना काँग्रेसने यावर बहिष्कार टाकला आहे. मात्र, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते हजेरी लावणार आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची नाराजी दूर करण्याचे मविआसमोर आव्हान आहे. दरम्यान, काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अखेर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील (ठाकरे गट शिवसेना) यांच्या प्रचारार्थ सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात महाविकास आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला. त्यामुळे या मेळाव्यात काँग्रेस नेते सहभागी होतील आणि मतदारसंघात पुन्हा एकजुटीने प्रचाराला लागतील, अशी आशा होती. परंतु काँग्रेस नेते विशाल पाटील अजूनही या मतदारसंघातून इच्छुक आहेत. ते कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे काँग्रेसचे स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यावर बहिष्कार टाकला. त्यामुळे स्थानिक पातळीवर सांगलीच्या जागेवरून तिढा कायम आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाची अडचण होत आहे.

सांगलीवरून महाविकास आघाडीत टोकाचे मतभेद झाले. याची तक्रार थेट पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचली. मात्र, पक्षश्रेष्ठींनी राज्यातील नेत्यांनीच हा प्रश्न सोडवावा, असा सल्ला दिला. मात्र, या जागेवर शिवसेना ठाकरे गट ठाम असल्याने अखेर ही जागा शिवसेनेलाच सोडावी लागली. मात्र, स्थानिक काँग्रेस नेते आपली भूमिका सोडायला तयार नाहीत. त्यामुळे सांगलीच्या जागेचा तिढा कायम असून, काँग्रेस नेते ठाम राहिल्याने सांगलीत महाविकास आघाडीत बिघाडीचे चित्र पाहायला मिळाले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाने मेळाव्याला हजेरी लावण्याचे ठरवले आहे. मात्र, काँग्रेसचे स्थानिक नेते मेळाव्याला हजेरी न लावता नागपूरला निघून गेले आहेत. तसेच स्थानिक नेत्यांनी बहिष्कारास्त्र उगारले. त्यामुळे काँग्रेसचा नेता या मेळाव्याला फिरकला नाही.

समर्थकांचा आग्रह थांबेना

काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे या मतदारसंघातून मागच्या अनेक वर्षांपासून तयारी करीत होते. त्यामुळे यावेळीही काँग्रेस त्यांनाच उमेदवारी देईल, असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांना होता. त्यामुळे युवा कार्यकर्त्यांची फळीही त्यांच्या मागे होती. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला जागा सुटली तरीही विशाल पाटील यांचे कार्यकर्ते सांगलीच्या जागेसाठी आग्रही आहेत. त्यामुळे दुरावा वाढत चालला आहे.

विशाल पाटील यांची बंडखोरी

काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अखेर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासमोर भाजपचे संजयकाका पाटील यांच्याबरोबर मित्र पक्षाच्या बंडखोर उमेदवाराचे आव्हान असणार आहे. काँग्रेस नेते नागपूरला रवाना झाल्यानंतर विशाल पाटील यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. आता मंगळवारी ते शक्तिप्रदर्शन करणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीसमोर आता दुहेरी लढ्याचे आव्हान असणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in