नरेंद्र मोदी-राहुल गांधी यांच्यात जुंपली; काँग्रेसला नेस्तनाबूत करा पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन

येती पाच वर्षे देशाच्या हितासाठी आणखी मोठे निर्णय घेतले जातील. भारताला जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनण्याची गॅरंटी मी देत आहे. तिसरी अर्थव्यवस्था म्हणजे, जनतेची कमाई वाढेल, रोजगार वाढतील व गाव व शहरात सुविधा वाढणार आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदी-राहुल गांधी यांच्यात जुंपली; काँग्रेसला नेस्तनाबूत करा पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन

रुद्रपूर : देशात तिसऱ्यांदा भाजप सरकार निवडून आल्यास आग लागेल, असे विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले होते. या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना पंतप्रधानांनी सांगितले की, ६० वर्षे देशात राज्य केल्यानंतर केवळ दहा वर्षे सत्तेबाहेर राहिल्यावर देशात आग लागण्याची भाषा राहुल गांधी करत आहेत. सत्तेत नसल्याने काँग्रेस हताश झाली आहे. त्यामुळे या पक्षाला जनतेने सर्वत्र नेस्तनाबूत करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. रुद्रपूर येथे झालेल्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

दिल्लीतील रामलीला मैदानात रविवारी झालेल्या सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते की, तिसऱ्यांदा मोदी सत्तेवर आल्यास देशात आग लागेल. तसेच भाजप ही निवडणूक जिंकण्यासाठी मॅचफिक्सिंग करत आहेत. त्यांनी राज्यघटनेत बदल केल्यास देशात जाळपोळ होईल, असे विधान केले होते. त्या विधानाचा समाचार घेताना मोदी म्हणाले की, काँग्रेस देशाला अस्थिरता व अराजकतेत ढकलेल. या निवडणुकीत दोन गट आहेत. एका बाजूला आम्ही इमानदार असून दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचारी, धमकी देणारे, शिव्याशाप देणारे आहेत. ते भ्रष्टाचाऱ्यांना वाचवा, असे म्हणत आहेत. पण लक्षात ठेवा, तिसऱ्यांदा आम्ही निवडून आल्यावर भ्रष्टाचाऱ्यांच्याविरोधात आणखी जोरदार कारवाई करू. भ्रष्टाचारी लोक मला धमक्या देत आहे. मात्र, मी घाबरणार नाही. प्रत्येक भ्रष्टाचाऱ्याच्याविरोधात कारवाई सुरूच राहिल, असे ते म्हणाले.

ते म्हणाले की, येती पाच वर्षे देशाच्या हितासाठी आणखी मोठे निर्णय घेतले जातील. भारताला जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनण्याची गॅरंटी मी देत आहे. तिसरी अर्थव्यवस्था म्हणजे, जनतेची कमाई वाढेल, रोजगार वाढतील व गाव व शहरात सुविधा वाढणार आहेत, असे ते म्हणाले.

काँग्रेसने देशाचे तुकडे केले. काँग्रेसने तामिळनाडूच्या जवळचे काचिथिवू हे भारताचे बेट श्रीलंकेला दिले. तेथे कोणीही भारतीय मच्छीमार जातात तेव्हा त्याला तुरुंगात टाकले जाते. काँग्रेस देशाचे संरक्षण करू शकते का? असा सवाल त्यांनी केला.

ते म्हणाले की, आणीबाणीवर बोलणाऱ्या काँग्रेसचा लोकशाहीवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे जनादेशाच्याविरोधात जनतेला भडकवण्याचे काम करत आहे. दक्षिण भारताला देशापासून वेगळे करण्याचे वक्तव्य करणाऱ्या नेत्याला काँग्रेसने निवडणुकीचे तिकीट दिले. काँग्रेस कधीही देश हिताबाबत विचार करू शकत नाही. काँग्रेस घुसखोरांना प्रोत्साहन देते तर भाजप देशावर प्रेम करणाऱ्या शरणार्थ्यांना नागरिकता देते. त्याचा त्रास काँग्रेसला होतो, अशी टीका पंतप्रधानांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in