"काँग्रेसनं एकाच नेत्याला १७ वेळा लॉन्च केलं, पण प्रत्येकवेळी तो फेल गेला..."फडणवीसांची राहुल गांधींवर टीका

'काँग्रेस आपल्या कर्मानं खाली गेलीये. ज्या नेत्याची क्षमताच नाही, त्याच नेत्याला १७ वेळा काँग्रेसनं लॉन्च केलं. पण प्रत्येकवेळी तो फेल गेला' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता राहुल गांधींना टोला लगावला.
देवेंद्र फडणवीस राहुल गांधी
देवेंद्र फडणवीस राहुल गांधीप्रातिनिधिक फोटो
Published on

पुणे: 'काँग्रेस आपल्या कर्मानं खाली गेलीये. ज्या नेत्याची क्षमताच नाही, त्याच नेत्याला १७ वेळा काँग्रेसनं लॉन्च केलं. पण प्रत्येकवेळी तो फेल गेला' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता राहुल गांधींना टोला लगावला. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विरोधी पक्ष प्रगल्भता दाखवायला तयार नाहीत, असं म्हणत त्यांनी सर्वच विरोधी पक्षांवर निशाणा साधला. याशिवाय अरविंद केजरीवालांचा जामीन, शरद पवार तसेच विरोधी पक्षांची भूमिका, पुणे विमानतळ, स्मार्ट सीटी इत्यादी विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली.

काँग्रेसनं एकाच नेत्याला १७ वेळा लॉन्च केलं-

"राजकारणामध्ये कुणी कुणाला संपवू शकत नाही. काँग्रेस आपल्या कर्मानं खाली गेलीये. कारण काँग्रेसला माहिती होतं की आपल्या नेत्यामध्ये क्षमताच नाही, तरीही त्याच नेत्याला १७ वेळा त्यांनी लॉन्च केलं आणि प्रत्येक वेळी तो फेल गेला," असं म्हणत फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधींना टोला लगावला.

फडणवीस म्हणाले की, "देशात विश्वासार्ह विरोधी पक्ष हवा आहे. राजकारण वर खाली होतं. एक काळ होता, जेव्हा आमचे दोनच खासदार होते. आम्हालाही हिणवलं जायचं. 'पर्याय पर्याय म्हणतात कोण, ज्यांचे लोकसभेत निवडून आलेत दोन...' पण त्याहीवेळी आम्ही विश्वासार्ह विरोधी पक्ष म्हणून होतो. ज्यावेळी देशाला गरज होती, तेव्हा आम्ही पुढे आलो. पण सध्याचा विरोधी पक्ष प्रगल्भता दाखवायलाच तयार नाही. देशाकरता, समाजाकरता एक भूमिका घ्यावी लागते. पण त्यांची एकच भूमिका, मोदींना शिव्या द्यायच्या. म्हणूनच आज आपल्याला विरोधी पक्षांची ही अवस्था पाहायला मिळतीये."

आम्ही ९० टक्के विकासावर बोलतो...

फडणवीसांनी विकासाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले की, 'आम्ही ९० टक्के विकासावर बोलतो, काय करायचंय याचं व्हिजन मांडतो, केवळ १० टक्केच राजकारण करतो. आमचे विरोधक भाषणात १ टक्काही विकासावर बोलत नाहीत. गद्दार, खुद्दार यावरती निवडणूक नाहीये. तुमचं लोकांसाठी काय व्हिजन आहे, तुमचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे, यावर निवडणूक आहे. ज्यावेळी ते विकासाविषयी आमच्याशी बोलायला जातात, तेव्हा त्यांच्याकडे एकही आयकॉनिक प्रोजेक्ट नाही. त्यामुळं ती अशी टीका करतात. पण लोकांना माहितीये आम्ही काय केलं, आमच्या सरकारनं काय केलं.'

logo
marathi.freepressjournal.in