
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्याच्या विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत राज्य सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांसह मंत्रीपदाची शपथ देखील घेतली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले. अजित पवार यांनी काही आमदारांसह बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीमधील संख्यबळ घटलं आहे. यानंतर काँग्रेसने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगण्यात येत आहे. महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) देखील काँग्रेसची ही मागणी मान्य केली आहे.
काँग्रेसचा विरोधीपक्षनेता होणार यानंतर महाराष्ट्र काँग्रेसच्या मुख्य काही नेत्यांच्या नावाची चर्चा सुरु होती. यात बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश होता. मात्र आत काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते पदावरुन चुरस निर्माण झाली आहे. सध्या विधानसभेत काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. अशात काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी थेट दिल्लीला पक्ष पाठवल्याची बाब समोर आली आहे. या पत्रात थोपटे यांनी आपल्याला ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. तसंच आपण विरोधी पक्षनेते पदासाठी इच्छूक असल्याचं देखील सांगितलं.
सुरुवातीला विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्याची नावे चर्चेत होती. आता मागील दोन दिवसांपासून काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेत्याची नावे पुढे आणण्याची शक्यता असल्याचं बोललं जातं आहे. आज काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची विधानसभेत बैठक पार पडणार आहे. त्यामुळे या बैठकीत विरोधी पक्षनेते पदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. दरम्यान, आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांना पाठवलेल्या पत्रावर ते काय निर्णय घेणार हे पाहाणे देखील महत्वाचं ठरणार आहे.