विधानसभा निवडणूकीपूर्वी काँग्रेसला धक्का; आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर?

नांदेडमधील काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
विधानसभा निवडणूकीपूर्वी काँग्रेसला धक्का; आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर?
Published on

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नांदेडमधील काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजप नेते अशोक चव्हाण यांची भेट घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप जितेश अंतापूरकर यांच्यावर आहे.

नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटींग केल्याचं समोर आलं होतं. यामध्ये नांदेडमधील देगलूर मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनीदेखील क्रॉस वोटिंग केल्याचा संशय काँग्रेसला आहे. दरम्यान जितेश अंतापूरकर यांनी भाजप नेते संजय उपाध्याय यांची भेट घेतली. त्यानंतर आता त्यांनी गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतल्यानं ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तविली जात आहे. दरम्यान संजय उपाध्याय आणि अशोक चव्हाण यांची भेट घेण्यापूर्वी अंतापुरकर यांनी देगलूर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली असल्याची माहिती समोर येत आहे.

जितेश अंतापूरकर हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या जवळचे मानले जातात. अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे काही समर्थक आमदारही भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. या समर्थक आमदारांमध्ये जितेश अंतापूरकर यांच्याही नावाची चर्चा होती. दरम्यान आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतापूरकर यांनी भाजप नेत्यांच्या वाढलेल्या भेटीगाठी पाहता ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असं बोललं जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in