गिरीश चित्रे/मुंबई
‘मविआ’चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर करावा, आम्ही पाठिंबा देऊ, अशी ग्वाही देत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीकडून यासंदर्भात होणाऱ्या बेलगाम वक्तव्यांचा शुक्रवारी समाचार घेतला. ‘संविधान संपवण्याचा केंद्र सरकारचा डाव असून, अद्याप संविधानावरचे संकट टळलेले नाही’, असा इशारा शरद पवार यांनी यावेळी दिला. तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय सर्व वरिष्ठ नेते घेतील, प्रथम राज्यातील भ्रष्ट सरकार हद्दपार करायला हवे, असे आवाहन केले.
मुंबईत षण्मुखानंद हॉलमध्ये शुक्रवारी काँग्रेस, राष्ट्रवादीने मुख्यमंत्री जाहीर करावा, आम्ही पाठिंबा देऊ!
झालेल्या ‘मविआ’च्या निर्धार मेळाव्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळच फोडण्यात आला. यावेळी ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’, ‘५० खोके एकदम ओके’, ‘जय जय रामकृष्ण हरी’, ‘विधानसभा निवडणुकीत तुतारी वाजवा’, अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी षण्मुखानंद हॉल दणाणून सोडला.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर ‘मविआ’चे नेते आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, या निवडणुकीतही विजय मिळवण्याच्या दृष्टीने ‘मविआ’ने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यादृष्टीने ‘मविआ’च्या तिन्ही पक्षांसह घटकपक्षांच्या बैठकीचा मुहूर्त शुक्रवारी जुळून आला. यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, विजय वडेट्टीवार, अबु आझमी, आदित्य ठाकरे, जयंत पाटील, दिपक निकाळजे , वर्षा गायकवाड, विनायक राऊत , नाना पटोले आदी उपस्थित होते.
‘भाजपसोबत युती होती, तेव्हा अशाच बैठका होत होत्या. मात्र भाजपचे राजकारण हे पाडापाडीचे असते, हा अनुभव भाजपच्या युतीत आम्ही घेतला आहे. परंतु, महाविकास आघाडीत अशा प्रकारचे राजकारण नको. महायुतीला सत्तेतून बाहेर खेचण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री कोण होणार ते आम्ही बघू, यात कोणाला लुडबुड करायची गरज नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी महायुतीला लगावला. भ्रष्टाचारात लुप्त महायुती फक्त महाराष्ट्राला लुटायला निघाली आहे. महायुतीला निवडणूक घेण्याची भीती वाटतेय. विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच महायुती सरकारला जाग आली आहे. त्यामुळे घोषणांचा पाऊस पाडला जात आहे आणि सगळीकडे स्वतःचे फोटो छापत आहेत. हिंमत असेल तर आज निवडणूक जाहीर करा, आम्ही निवडणुकीला सामोरे जायला तयार आहोत, असे ठाकरे म्हणाले.
महायुतीच्या ‘लाडकी बहीण’ योजनेवर टीका करताना ते म्हणाले की, खरे तर महायुतीला ‘लाडकी खुर्ची’ टिकवायची आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत गाफिल राहू नका, विजय महाविकास आघाडीचाच होईल. विधानसभा निवडणुकीत एक तर तू राहशील, किंवा एक तर मी राहीन, असे खुले आव्हानही उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना दिले.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मर्यादा वाढीचा अधिकार केंद्र सरकारला आहे. मात्र, महाराष्ट्रात दोन समाजात आग लावण्याचे काम महायुती सरकार करीत आहे, अशी सडकून टीका उद्धव ठाकरे यांनी केली. महाविकास आघाडीत हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. ‘मविआ’ने अडीच वर्षांत काय काम केले, हे तुम्हीही गावोगावी फिरुन सांगा, असे आवाहन ठाकरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.
होय, मुस्लिम बांधवांनी मतदान केले!
मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली आणि राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला. कोरोनामुळे राज्यात एकही मृत्यू होऊ नये यासाठी तातडीने काही निर्णय घेणे अपेक्षित होते. कोरोना काळात घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांचे प्राण वाचले, त्यात मुस्लिम समाजातील लोकांचा सहभाग होता. त्याची जाणीव ठेवत त्यांनी मतदान केले. मात्र ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच गद्दारी केली, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला.
आता धर्मनिरपेक्षतेची भाषा
धर्मनिरपेक्षतेची भाषा करणाऱ्यांनी आता हिंदुत्व सोडले, वक्फ बोर्डाचे बिल आणले. केंद्र सरकारमध्ये भाजपचे बहुमत असूनही बिल मंजूर का करुन घेतले नाही. निवडणुका जवळ आल्या की तुम्ही सेक्युलरिझमची भाषा करता. मोदींची गॅरंटी आता संपली आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी मोदींवर केला.
देवस्थानच्या जमिनी मित्र कंत्राटदाराला
राम मंदिर उभारणीसाठी कारसेवक गेले त्यावेळी भाजप कुठे होती. आज राम मंदिर उभारले आणि गळती लागली. देवस्थानच्या जमिनी मित्र कंत्राटदाराला विकल्या जात आहेत. मुलुंड, देवनार, कुर्ला आदी ठिकाणच्या जमिनी विक्रीसाठी काढल्या आहेत. मुंबईवर यांचा डोळा आहे, पण आता मुंबईकरच गप्प बसणार नाहीत. विधानसभा निवडणुकीत महायुतीला ते जागा दाखवणारच, असा दावाही त्यांनी केला.
महायुतीच्या बुडाला ‘मशाल’ आग लावणार
शिवसेना चोरली, पक्षचिन्ह चोरले, असे हे गद्दार. शिवसेना म्हणून आम्हाला ‘मशाल’ चिन्ह मिळाले. हीच ‘मशाल’ महायुतीच्या बुडाला आग लावल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.
संविधानावरचे संकट टळलेले नाही - शरद पवार
लोकसभा निवडणुकीत ‘मविआ’ला जनतेचा कौल मिळाला. लोकसभा निवडणुकीत ‘मविआ’ने ‘संविधान वाचवा’ असे आवाहन केले. आता केंद्र व राज्य सरकार म्हणते हे ‘फेक नरेटिव्ह’ आहे, परंतु संविधानावरचे संकट अद्याप टळलेले नाही. आजही धोका कायम आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जागरुक रहा, देश आणि महाराष्ट्र वाचण्यासाठी झटत रहा, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी मेहनत करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी केले.
महाराष्ट्रातील भ्रष्ट सरकार हद्दपार करायचे आहे - पटोले
सद्य:स्थितीत माध्यमांमध्ये विचारले जाते की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?, त्यामुळेच उद्धवजी ठाकरे यांनी आज मुद्दामहून उमेदवार जाहीर करावा, असे आवाहन कॉंग्रेस व राष्ट्रवादीला केले. परंतु, आम्ही एकदिलाने काम करणार आहोत. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय सर्व वरिष्ठ नेते बसून घेतील, फक्त आम्हाला काहीही करून महाराष्ट्रातील भ्रष्ट सरकार घालवायचे आहे, अशी भूमिका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी मांडली. केंद्रातील मोदी सरकारचे ‘एटीएम’च महाराष्ट्र आहे, त्यामुळे केंद्राचे हे ‘एटीएम’च आपण बंद करायचा निर्धार करणार आहोत, असेही ते म्हणाले.