भिवंडीत काँग्रेस की राष्ट्रवादी; तिढा कायम

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाही गटबाजीमुळे पक्षश्रेष्ठीही जागावाटपाच्या तिढ्यात अडकल्याचे दिसून येत आहे. कारण लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होऊनही गटबाजी आणि पक्षांतरामुळे पक्षा-पक्षात गळती सुरू आहे.
भिवंडीत काँग्रेस की राष्ट्रवादी; तिढा कायम

भिवंडी : महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून २०२२ मध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेला बगल देत ४० आमदारांना सोबत घेऊन स्वतःचा शिंदे गट स्थापन करून राज्याच्या राजकारणात भूकंप आणला. त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकत अजित पवार गट प्रस्थापित केला. मात्र, या सर्व गटबाजीने निष्ठावंतांच्या विश्वासाचा भ्रमनिरास होऊन ठाणे-पालघर जिल्ह्यात मतदार संभ्रमावस्थेत आहे. तर महायुतीचे निष्ठावंत आपल्या भूमिकेवर किती ठाम राहतील, यावरही लोकसभा २०२४ निवडणुकीचा निकाल ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाही गटबाजीमुळे पक्षश्रेष्ठीही जागावाटपाच्या तिढ्यात अडकल्याचे दिसून येत आहे. कारण लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होऊनही गटबाजी आणि पक्षांतरामुळे पक्षा-पक्षात गळती सुरू आहे. एकीकडे जागावाटपाबद्दल महायुती तेवढी गोंधळात नसून महायुतीचा प्रचार जोमाने सुरू झाला आहे. दुसरीकडे या सर्वाचा विचार करता पक्षबांधणी आणि प्रचाराला उशिर होऊन महविकास आघाडीला भिवंडी लोकसभा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच भिवंडी लोकसभा क्षेत्रातून महाविकास आघाडीचे संभाव्य सर्वच उमदेवार आक्रमक राहिले आहेत. त्याउलट उमेदवारी मिळविण्यासाठी संभाव्य उमेदवार दिल्लीत ठाण मांडून बसल्याचे सूत्रांकडून समजते. परंतु, भिवंडी लोकसभा क्षेत्रातून काँग्रेस की राष्ट्रवादी, असाच तिढा आतापर्यंत कायम आहे.

भिवंडीतील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना आगामी लोकसभा निवडणुकीत कोणता उमेदवार टक्कर देणार याचीच चर्चा सध्या भिवंडी लोकसभा क्षेत्रातून रंगत आहे. तर महाविकास आघाडी पक्षश्रेष्ठीही कपिल पाटील यांच्या विरोधात कोणता उमेदवार द्यायचा, या पेचात असून संभाव्य उमेदवारांना खेळवत आहेत. त्यातच नुकतेच भिवंडी लोकसभा क्षेत्रासाठी आघाडीतून राष्ट्रवादीला उमेदवारी देण्याच्या वृत्तामुळे भिवंडी लोकसभा क्षेत्रातील काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. पारंपरिकपणे भिवंडी मतदारसंघावर काँग्रेसने दावा ठोकत आग्रही मागणी लावून धरली आहे. तसे न झाल्यास नेत्यांनी राजीनामे देण्याची चर्चा केल्याने आघाडीची डोकेदुखी आणखी वाढली आहे. दुसरीकडे स्थानिक काँग्रेस नेत्यांनी भाजपची सुपारी घेऊन तिकीट काँग्रेसलाच मिळावं यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून रान उठवल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे.

भिवंडी परिसरातील मतदार संभ्रमात

महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी इच्छुक उमेदवार विरोधकावर टीका सोडून एकमेकांवरच असे आरोप करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भिवंडी लोकसभा क्षेत्रातील आघाडीची प्रजा स्वत:च्याच 'राजा'च्या प्रतीक्षेत असून 'कोणता झेंडा घेऊ हाती' अशी परिस्थिती आघाडी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in