काँग्रेस कार्यकर्त्यानं धुतले नाना पटोलेंचे चिखलानं माखलेले पाय, वादावर नाना म्हणाले, "सगळं लोकांसमोर झालंय, पण....

मी तर उजेडात होतो, सगळं लोकांसमोर झालंय. पण ज्यांचे पाय ईडीनं माखलेले आहेत, ते कुणाचे पाय धुतात, तेही समोर यायला हवं, असं नाना पटोले म्हणाले.
काँग्रेस कार्यकर्त्यानं धुतले नाना पटोलेंचे चिखलानं माखलेले पाय, वादावर नाना म्हणाले, "सगळं लोकांसमोर झालंय, पण....
Published on

अकोल्यात एका काँग्रेस कार्यकर्त्यानं नाना पटोलेंचे चिखलानं माखलेले पाय धुतले कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेण्याच्या कृतीमुळं नवा वाद निर्माण झाला आहे. या घटनेचे व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. दरम्यान नाना पटोले यांनी या घटनेचं स्पष्टीकरण दिलं आहे. माझे पाय खराब झाल्यामुळं कार्यकर्ता पायावर पाणी टाकत होता, मी ते धुतले, असं म्हटलं आहे. तसेच, मी तर उजेडात होतो, सगळं लोकांसमोर झालंय. पण ज्यांचे पाय ईडीनं माखलेले आहेत, ते कुणाचे पाय धुतात, तेही समोर यायला हवं, असं नाना पटोले म्हणाले.

नेमकं काय घडलं?

अकोल्यातील वाडेगाव येथे नाना पटोले कार्यक्रमासाठी आले होते. वाडेगाव येथील नानासाहेब चिंचोळकर विद्यालयाच्या मैदानावर संत गजानन महाराजांची पालखी थांबली होती. पावसामुळं या मैदानात चिखल झाला होता. नाना पटोले यांनी चिखलातून मार्ग काढत संत गजानन महाराज पालखीचं दर्शन घेतलं. मात्र दर्शनानंतर गाडीजवळ आलेल्या नाना पटोलेंचे पाय एका कार्यकर्त्यानं धुतले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नाना पटोलेंवर चौफेर टीका होऊ लागली. यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

सगळं लोकांसमोर झालं आहे: नाना पटोले

नाना पटोले म्हणाले की, "तो व्हिडीओ मी पाहिला आहे. काल मी अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे कार्यक्रमासाठी गेलो होतो. गजानन महाराजांची पालखी शेगावहून निघून वाडेगावामध्ये मुक्कामासाठी होती. ज्या मैदानात पालखी होती, तिथे मी लोकांबरोबर पायी गेलो. तिथं चिखल असल्यामुळं माझे पाय खराब झाले. पाय खराब झाल्यामुळं कार्यकर्त्यानं पाणी आणलं. तो वरुन पाणी टाकत होता आणि मी हाताने पाय धुवत होतो. मीडियामध्ये माझ्याबद्दल सध्या जास्त प्रेम आहे. त्यामुळं ते दाखवलं. पण ज्यांचे पाय ईडीने माखलेले आहेत, ते अंधारात कोणाचे पाय धुतात. हेसुद्धा दाखवा. मी तर तिथं सत्संगामध्ये, वारकऱ्यांमध्ये गेलो होतो. वारकऱ्यांना असंही बदनाम करण्याचे काम फडणवीस सरकारच्या वेळी झालं. त्यामध्ये साप सोडण्यात आला होता. वारकरी प्रथेला बंद करण्याचा प्रयत्न केला जातोय. 'हर घरमे नल, नल मे जल' असा जो नारा लावला होता, तिथं जलच नाहीये. इथं नळ असता, तर तिथं पाय धुतले असते. मी तर उजेडात होतो. सगळं लोकांसमोर झालं आहे."

नाना पटोलेंनी स्वतःला संत समजू नये : अमोल मिटकरी

"ही अत्यंत संतापजनक घटना आहे. नेत्यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणं हा लोकशाहीचा आणि त्या कार्यकर्त्याचाही अपमान आहे. नाना पटोलेंनी स्वतःला संत समजू नये आणि कार्यकर्त्याला नोकर समजू नये.कार्यकर्त्यांनीही समजून घ्यावं की, लोकशाहीमध्ये कुणी आपला मालक नसतो. त्यामुळं असं कृत्य करू नये. ही सत्तेची मस्ती होती का? असा प्रश्न मी नाना पटोलेंना मी विचारतो, असं अमोल मिटकरी म्हणाले.

कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणं हीच काँग्रेसची संस्कृती: अतुल भातखळकर

"काँग्रेस अध्यक्ष नाना पटोलेंनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणं हीच काँग्रेसची खरी संस्कृती आहे. काँग्रेस केवळ घराणेशाहीवर चालणार पक्ष आहे. तिथं कार्यकर्ते नसतात, तिथं नोकर असतात. सर्व नेते गांधी घरण्याचे नोकर असतात, हेच या घटनेनं सिद्ध केलं आहे. म्हणूनच वायनाडची जागा रिकामी केल्यानंतर ती काँग्रेस कार्यकर्त्याला देण्याऐवजी ती जागा प्रियंका गांधी लढणार, कारण हा घराणेशाहीवर चालणारा पक्ष आहे," असं भाजप नेते आमदार अतुल भातखळकर म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in