
मुंबई : केंद्रातील मोदी सरकार ईडी, सीबीआयचा गैरवापर करत विरोधी पक्षांना संपवू पाहत आहे. विरोधी पक्षांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या विरोधात ईडीची कारवाई ही राजकीय हेतूने केलेली आहे. मोदी-शहा अशा कारवाया करून काँग्रेस पक्षाला संपवू शकत नाहीत आणि अशा कारवायांनी काँग्रेसचे मनोधैर्य तसूभरही खचणार नाही, उलट मजबूतपणे या हुकुमशाहीचा मुकाबला करू, असे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.
मोदी सरकारने सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईचा आम्ही निषेध करतो. जनतेत या कारवाईबद्दल तीव्र रोष आहे. काँग्रेस पक्षाने या दडपशाही विरोधात काल व आज दोन दिवस देशभर आंदोलन केले, महाराष्ट्रातही विविध ठिकाणी आंदोलन करून भाजप सरकारचा निषेध केला. मोदी-शहा यांच्या सरकार विरोधात यापुढेही काँग्रेस पक्ष मजबुतीने लढा देईल, असा विश्वास रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.
मोदी सरकारकडून सुरू असलेल्या ईडीच्या गैरवापराविरोधात रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली दादर येथील टिळक भवन येथे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आमदार विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, खासदार रजनीताई पाटील, खासदार प्रणिती शिंदे, खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, शिवाजीराव मोघे, वसंत पुरके यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली.
दादर परिसरातील टिळक भवन परिसरात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईचा निषेध करण्यात आला. गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसतर्फे देशभर आंदोलन करण्यात येत आहे.
महाबळेश्वरला काँग्रेसचे शिबीर
प्रदेश व जिल्हा स्तरावरील कार्यकारिणीची पुनर्रचना लवकरच केली जाईल आणि महाबळेश्वर येथे काँग्रेस पक्षाचे एक शिबीर आयोजित केले जाणार आहे, अशी माहिती चेन्नीथला यांनी दिली.
जनविरोधी धोरणांवर आवाज उठवणार
रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत व हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११.३० वाजता काँग्रेस पक्षाच्या खासदारांची बैठक झाली. त्यानंतर दुपारी २ वाजता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. संवाद, समन्वय, रणनिती यावर या बैठकीत चर्चा झाली. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांवर सभागृहात व सभागृहाबाहेर आवाज उठवणे आणि जनतेचे मुद्दे उपस्थित करण्यावर सविस्तर चर्चा झाली, अशी माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
जिचकार यांची घरवापसी
रमेश चेन्नीथला, हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री स्व. डॉ. श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ज्ञवल्क्य जिचकार यांची काँग्रेस पक्षात घरवापसी झाली. निवडणुकीच्या काळात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, ती मागे घेऊन त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते धनंजय शिंदे यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला.