काँग्रेसशासित राज्ये ही शाही परिवाराचे 'एटीएम'; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

देशात जेथे काँग्रेसचे सरकार स्थापन झाले ते राज्य पक्षाच्या शाही परिवाराचे 'एटीएम' (ऑटोमॅटेड टेलर मशीन) बनले असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला...
काँग्रेसशासित राज्ये ही शाही परिवाराचे 'एटीएम'; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
Published on

अकोला : देशात जेथे काँग्रेसचे सरकार स्थापन झाले ते राज्य पक्षाच्या शाही परिवाराचे 'एटीएम' (ऑटोमॅटेड टेलर मशीन) बनले असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे एका जाहीर सभेत केला. मात्र आम्ही महाराष्ट्राला काँग्रेसचे 'एटीएम' होऊ देणार नाही, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारात इतका बुडाला आहे की हाच पक्ष एकेकाळी सत्तेवर कसा होता याची एखादी व्यक्ती कल्पना करू शकते, असेही मोदी म्हणाले.

७०० कोटींची खंडणी

जेव्हा काँग्रेसने सरकार स्थापन केले, तेव्हा ते राज्य पक्षाच्या शाही परिवाराचे 'एटीएम' बनले. काँग्रेसशासित कर्नाटकमधून महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी मद्य व्यवसायातून ७०० कोटी रुपयांची खंडणी उकळण्यात आल्याचा आरोपही यावेळी मोदी यांनी केला. तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश ही राज्येही शाही परिवाराची 'एटीएम' झाली आहेत, असे ते म्हणाले.

महायुतीच्या वचननाम्यात महिलांची सुरक्षा, रोजगाराच्या संधी, लाडकी बहीण योजनेचा विस्तार यावर प्रकाशझोत आहे, तर महाविकास आघाडीने घोटाळापत्र जाहीर केले आहे. महाविकास आघाडी म्हणजे भ्रष्टाचार, टोकन मनी आणि बदल्यांचा व्यापार आहे याची संपूर्ण देशाला जाणीव आहे, असेही मोदी म्हणाले.

डॉ. आंबेडकरांचे 'पंचतीर्थ'

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचतीर्थांना कधी भेट दिली आहे हे सिद्ध करून दाखवावे, असे आव्हानही मोदी यांनी शाही परिवाराला दिले. डॉ. आंबेडकर यांचे जन्मस्थान असलेले मध्य प्रदेशातील महू, ब्रिटनमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी लंडनमध्ये ज्या घरात वास्तव्य केले ते घर, नागपूरमधील दीक्षाभूमी, दिल्लीतील महापरिनिर्वाण स्थळ आणि चैत्यभूमी या ठिकाणांना मोदी यांनी 'पंचतीर्थ' असे संबोधले आहे.

डॉ. आंबेडकर हे दलित असल्याने ते त्यांचा तिरस्कार करतात, मात्र डॉ. आंबेडकर हे आपल्यासाठी, भाजपसाठी आणि आपल्या सरकारसाठी प्रेरणास्थान आहे. आम्ही यूपीआयलाही 'भीम यूपीआय' असे नाव दिले आहे.

एक है तो सेफ है

जाती आणि समाज यांना एकमेकांविरोधात - लढविण्याची आणि दलित आणि मागासवर्ग यांना एकत्रित - न होऊ देण्याची काँग्रेसची योजना आहे. मात्र, - हरयाणातील जनतेने 'एक है तो सेफ है'चे पालन करून हा डाव हाणून पाडला. ओबीसी, दलित आणि आदिवासी यांच्यात संघर्ष झाला तर मताविभागणी होईल आणि काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल, असा त्यांचा डाव आहे. काँग्रेसची ही चाल आणि चरित्र आहे. हरयाणातील दंगलीत दलित मारले गेले आणि काँग्रेस त्यांना मारणाऱ्यांच्या पाठीशी उभा राहिला, असेही मोदी म्हणाले. देश दुर्बल झाला तर पक्ष सामर्थ्यवान होईल याची काँग्रेसला जाणीव आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, अनुसूचित जाती-जमाती, दलित आणि आदिवासी यांच्यातील ऐक्यामुळे गेल्या काही वर्षांत काँग्रेसने आपला हा आधार गमावला आहे, असे मोदी यांनी नांदेड येथील सभेत सांगितले. 'भाजप-महायुती आहे, तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे', ही घोषणा सध्या सर्वांच्या ओठांवर आहे, असे ते म्हणाले.

काँग्रेसच्या लाल पुस्तकात कोरी पाने

काँग्रेसचे लोक संविधानाच्या नावावर लाल पुस्तकांचे वाटप करत आहेत. त्यावर भारताचे संविधान असे लिहिले आहे. मात्र, त्या पुस्तकाची पान कोरी आहेत. - निवडणुकीच्या प्रचारात खोट्या गोष्टी पसरवण्याचे काम काँग्रेस पक्ष करतो आहे. संविधानाच्या नावावर लाल पुस्तक छापणे आणि त्यात संविधानाचा एक शब्दही न - लिहिणे हा संविधान संपवण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in