राज्यात काँग्रेसची भरारी; टिळक भवनात शुकशुकाट

लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेस पक्षाला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले. त्यामुळे राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असला तरी राज्याचे प्रदेश कार्यालय असलेल्या टिळक भवनमध्ये दिवसभर शुकशुकाट पाहायला मिळाला.
राज्यात काँग्रेसची भरारी; टिळक भवनात शुकशुकाट

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेस पक्षाला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले. त्यामुळे राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असला तरी राज्याचे प्रदेश कार्यालय असलेल्या टिळक भवनमध्ये दिवसभर शुकशुकाट पाहायला मिळाला. सायंकाळी ४ वाजता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पत्रकार परिषदेसाठी दाखल झाल्यानंतर येथे तुरळक कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गुलाल उधळला.

आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीमध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालाने अनेकांना धक्का दिला. गेल्या निवडणुकीमध्ये राज्यात केवळ एक जागा मिळविणाऱ्या काँग्रेसने या निवडणुकीत मोठी कामगिरी केली. या कामगिरीनंतर काँग्रेस कार्यकर्ते महाराष्ट्र प्रदेश कार्यालय असलेल्या टिळक भवन येथे जल्लोष करण्यासाठी जमा होतील, यासाठी येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र काँग्रेसने राज्यात मोठी मुसंडी मारल्यानंतरही कार्यकर्ते टिळक भवनाकडे फिरकले नसल्याचे दिसले.

उबाठा गटाने मुंबईत यश मिळाल्याने सेना भवन येथे शिवसैनिकांनी जल्लोष केला. मात्र काँग्रेसने राज्यात यश मिळाल्यानंतरही कार्यकर्त्यांमधील निरुत्साह दिसून आला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सायंकाळी टिळक भवन येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या काही कार्यकर्त्यांनी काँग्रेस जिंदाबादच्या घोषणाबाजी करत गुलाल उधळला. यानंतर मात्र कोणतीही घोषणाबाजी किंवा कार्यकर्ते टिळक भवन परिसरात दिसले नाहीत.

logo
marathi.freepressjournal.in