क्रिकेटपटूंना ११ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यास काँग्रेस, ठाकरे गटाचा विरोध

टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला ११ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या निर्णयावर काँग्रेस आणि शिवसेनेने (उबाठा) प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
क्रिकेटपटूंना ११ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यास काँग्रेस, ठाकरे गटाचा विरोध
Screengrab
Published on

मुंबई: टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला ११ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या निर्णयावर काँग्रेस आणि शिवसेनेने (उबाठा) प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. असे बक्षीस जाहीर करून सरकारला स्वतःचीच पाठ थोपटून घेण्याची इच्छा दिसते आहे, असेही काँग्रेस आणि शिवसेनेने (उबाठा) म्हटले आहे. भाजपने त्यावर पलटवार केला असून काँग्रेस यावर राजकारण करीत असल्याचा आरोप केला आहे.

भारतीय क्रिकेटपटूंनी विश्वचषक जिंकला त्याचा आम्हाला अभिमानच आहे, मात्र राज्याच्या तिजोरीतून त्यासाठी ११ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची गरज नव्हती.

मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खिशातून ती रक्कम द्यावी, असेही विरोधी पक्षांनी म्हटले आहे. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी यावर प्रत्युत्तर देताना काँग्रेस या प्रश्नाला राजकीय रंग देत असल्याचे म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाला ११ कोटी रुपयांचे इनाम जाहीर केले. विश्वचषक विजेत्या संघातील मुंबईच्या रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव या चार क्रिकेटपटूंचा विधान भवनात सत्कार करण्यात आला, त्यावेळी बक्षिसांची घोषणा करण्यात आली होती.

राज्याच्या तिजोरीतून ११ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची काय गरज होती, हा स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यासारखा प्रकार आहे, तिजोरी होऊ द्या रिक्त, गरीबांना असेच मरण्यासाठी सोडून द्या, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वार्ताहरांना सांगितले. तर राज्याच्या तिजोरीतून ११ कोटी रुपये देण्याची गरज नव्हती, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे केले.

logo
marathi.freepressjournal.in