काँग्रेस २० ऑगस्ट रोजी प्रचाराचा नारळ फोडणार; राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत भव्य कार्यक्रम

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. काँग्रेसनेही मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून, २० ऑगस्ट रोजी दिवंगत पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
काँग्रेस २० ऑगस्ट रोजी प्रचाराचा नारळ फोडणार; राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत भव्य कार्यक्रम
Published on

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. काँग्रेसनेही मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून, २० ऑगस्ट रोजी दिवंगत पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ मुंबईत फोडणार असून, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह देशभरातील पक्षाचे वरिष्ठ नेते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे.

हॉटेल लीला येथे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक रविवारी पार पडल्यानंतर रमेश चेन्नीथला प्रसार माध्यमांशी बोलत होते. मविआ सक्षम आहे आणि सर्वजण मिळून महाराष्ट्रात मविआचे सरकार आणण्यासाठी एकजूट होऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. लोकसभा निवडणुकीत मविआला जनतेने भरघोस प्रतिसाद दिला असून, विधानसभेलाही असाच प्रतिसाद मिळेल, असा विश्वास चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

रविवारी पार पडलेल्या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते सतेज बंटी पाटील, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, आमदार भाई जगताप, माजी मंत्री अस्लम शेख, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे आदी उपस्थित होते.

वाझे, फडणवीस नौटंकी सुरू !

गृहमंत्री फडणवीस म्हणतात त्याच्याकडे व्हिडीओ, ऑडिओ आहेत, वाझे म्हणतो फडणवीस यांना माहिती दिली, तर फडणवीस म्हणतात, माझ्याकडे कसलाही कागद दिला नाही, ही सर्व नौंटकी चालली आहे. कैदेतील व्यक्ती मीडियाशी कसा काय बोलू शकतो, पण काँग्रेसला या विषयावर फार चर्चा करण्याची गरज वाटत नाही, असे पटोले यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवण्याचा मविआचा प्रयत्न - नाना पटोले

महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवण्याचा मविआचा प्रयत्न आहे. महाभ्रष्टयुती सरकारने राज्याचा स्वाभिमान विकला आहे, हे सरकार गुजरात धार्जिणे आहे. महाराष्ट्र लुटून सुरतेला देण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रातील जमिनी, संपत्ती विकत आहेत अशा परिस्थितीत महाराष्ट्र वाचवणे हाच मविआचा संकल्प आहे. या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली. तसेच राज्यातील विविध मुद्दे घेऊन महाभ्रष्ट युती सरकारविरोधात चार्जशीट बनवून ती प्रसिद्ध केली जाणार आहे. राजीव गांधी यांच्या जयंती कार्यक्रमाच्या दिवशी विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले.

लाडकी बहीण योजनेला काँग्रेसचा विरोध नाही

लाडकी बहीण योजनेला काँग्रेसचा विरोध नाही. भाजप, सत्ताधारी पक्षातील जे लोक काँग्रेसविरोधात असा अपप्रचार करत आहेत ते पराभवाने घाबरले आहेत. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेशी काँग्रेसचा काहीही संबंध नाही. तेलंगणा, कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने महिलांसाठी महालक्ष्मी योजना सुरू केलेली आहे, संजय गांधी निराधर योजना अनेक वर्षांपासून सुरू आहे. महायुती सरकारनेच काँग्रेसच्या योजनांची नक्कल केली आहे. महायुती सरकार महिलांना फक्त १५०० रुपये देणार आहे, परंतु काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांना लखपती केले जाईल, असे ही पटोले म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in