
मुंबई : भाजप एवढी बलाढ्य आहे, तर मग शिवसेना, राष्ट्रवादीला का फोडले, असा रोकडा सवाल विचारतानाच, मुख्यमंत्र्यांच्या दोन सावल्या, कोणती खरी, कोणती अयोग्य हे सांगणे कठीण असल्याचे सूचक उद्गार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काढले. दैनिक ‘नवशक्ति’ व ‘फ्री प्रेस जर्नल’च्या ‘संवाद’ कार्यक्रमात ते बुधवारी बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
महाविकास आघाडी म्हणून लढणार की स्वबळावर लढणार यावर ते म्हणाले की, सध्या असे वातावरण तयार होऊ लागलेय की भाजप बलाढ्य होत चालला आहे. त्याविरूद्ध सर्व विरोधकांनी आता एकत्र येऊन लढायला हवे. तथापि, प्रत्यक्षात भाजपच आतून खूप घाबरला आहे. आमच्याकडे मोदी आहेत. शहा आहेत. फडणवीस आहेत. आमचे एक कोटी सदस्य आहेत. त्यांच्याजवळ एवढे होते, मग त्यांनी एका शिवसेनेच्या दोन शिवसेना का केल्या? एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी का केल्या? त्यांनी स्वत:च्या भरवशावरच लढायला हवे होते? भाजपने किती तरी काँग्रेसचे लोक घेतले. छोट्या पक्षांनाही सोबत घेतले. तात्पर्य हेच आम्ही मोठे असल्याचा आव जरी भाजपची नेतेमंडळी आणत असली तरी प्रत्यक्षात भाजपच आतून घाबरलेली आहे. भाजप बलाढ्य असेल तर अनेक आक्षेप असलेल्यांना आयुक्त का करता? म्हणूनच भाजपचा बुरखा फाडण्याचे काम आगामी काळात आम्ही करणार आहोत.
बलाढ्य भाजप एवढ्या लोकांना सत्तेत घेऊन बसलीय की सांगता सोय नाही. भाजपवाले दाखवताहेत आम्ही खूप मजबूत आहोत. प्रत्यक्षात एका मुख्यमंत्र्यांच्या दोन सावल्या आहेत. एक खरी की दुसरी खरी? की सावलीच अयोग्य असते? का तीनही मुख्यमंत्री आहेत, असा एकंदरीत सावळा गोंधळ उडाला आहे. महायुतीचे नेते परस्परांचे ऐकत नाहीत. त्यामुळे ही महायुती मजबूत असल्याचा दावा पोकळ आहे. भाजपला बाजूला ठेवण्यासाठीच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे सेना अशी महाआघाडी झालेली आहे. लोकसभेत आम्ही चांगली कामगिरी केली. विधानसभेत आमचे पतन झाले असे राजकीयदृष्ट्या म्हणणे योग्य नाही. आम्ही कुठे कमी पडलो, कुठे चुकलो हे आम्हाला माहित आहे. देशात आता भाजपविरोधातील वातावरण वाढत चालले आहे. महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राहुल गांधी, मुंबई बॉम्बस्फोटाच्या घटनांमधील आरोपी सापडले. कसाबची चौकशी झाली. मास्टरमाईंडचा शोध लागला. तथापि, पुलवामाचे आरोपी अद्याप सापडलेले नाहीत याविषयी सपकाळ यांनी आश्चर्य व्यक्त केले.
ईव्हीएमचा प्रश्न गंभीर
ईव्हीएमबाबत गंभीर प्रश्न, त्याचे उत्तर मिळत नाही! चौकशीसुद्धा करत नाही. त्यामुळे दाल में कुछ काला है असे मानण्यास वाव आहे. रात्रीच निवडणुक आयुक्त नेमणे ही लोकशाहीची पायमल्ली आहे असेही त्यांनी नमूद केले.
हा बदलच पुढील बदल घडवेल!
देशापुढे दोनच विचारधारा. एक काँग्रेस व दुसरी भाजप. त्यात तिसरा विचार दिसत नाही. त्यात काँग्रेसला खूप वाव आहे. ही आमची स्थिती आहे. एका तळागाळातील साध्या माणसाला प्रदेशाध्यक्ष केलेय. हा बदल पक्षसंघटनेत पुढील बदल घडवून आणेल. माझे काम माझा पक्ष मजबूत करणे आहे. स्थानिय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ.
निवडणुकांबाबत संभ्रम
फेब्रुवारी २५ रोजी सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत सुनावणी होणार आहे. या सुनावणीत ५४ याचिकांवर निर्णय होईल आणि त्यानंतर निवडणुकांची दिशा स्पष्ट होईल. जर पुढील तारीख देण्यात आली, तर पावसाळ्यात निवडणुका घेणे अशक्य होईल, असेही त्यांनी नमूद केले.
राजकीय प्रगल्भता दाखवायला हवी!
महाराष्ट्रातील राजकीय नेते प्रगल्भ आहेत. या राज्यातील नेत्यांचे पक्ष भिन्न असले तरी त्यांच्यात नेहमीच संवाद होत आलेला आहे. त्यामुळेच सर्वच नेत्यांनी राजकीय प्रगल्भता दाखवायला हवी. सत्ताधारी-विरोधक यांच्यात संवाद हवा. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. ती राजकीय सभ्यता टिकायला हवी असे प्रांजल मत त्यांनी मांडले.
मुख्यमंत्र्यांच्या दोन सावल्या, कोणती खरी, कोणती अयोग्य हे सांगणे कठीण!
पुलवामाचे आरोपी अद्याप सापडलेले नाहीत
ईव्हीएमबाबतच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत संभ्रम