काँग्रेसमध्ये वाढली नाराजी: वर्षा गायकवाड यांची थेट दिल्लीकडे तक्रार

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा तथा दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातील नेत्या वर्षा गायकवाड दक्षिण-मध्य मुंबईच्या जागेसाठी आग्रही होत्या. त्यांचे वडील एकनाथ गायकवाड यांनी या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केल्याने ही जागा काँग्रेसला मिळावी, अशी त्यांची मागणी होती. त्यामुळे या जागेसाठी त्या सुरुवातीपासून आग्रही होत्या.
काँग्रेसमध्ये वाढली नाराजी: वर्षा गायकवाड यांची थेट दिल्लीकडे तक्रार
Published on

विशेष प्रतिनिधी/मुंबई

महाविकास आघाडीने मंगळवारी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. त्यानुसार काँग्रेसच्या वाट्याला १७ जागा आल्या आहेत. मात्र, काँग्रेस नेते सांगली, भिवंडीसह दक्षिण-मध्य मुंबईच्या जागेवरून आग्रही होते. तथापि, भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीत तिढा नको, असा विचार करून जागांचा वाद संपवून मंगळवारी हे सूत्र जाहीर केले. परंतु या घोषणेनंतर सांगली, भिवंडीसह दक्षिण-मध्य मुंबईच्या काँग्रेस नेत्यांमध्ये खदखद वाढली आहे. एवढेच नव्हे, तर खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही नाराज झाले आहेत. मात्र, पक्षश्रेष्ठींनी यात लक्ष घालून सूचना केल्याने वाद संपविण्याच्या उद्देशाने माघार घेतली. परंतु या मतदारसंघात खदखद वाढली असून, याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा तथा दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातील नेत्या वर्षा गायकवाड दक्षिण-मध्य मुंबईच्या जागेसाठी आग्रही होत्या. त्यांचे वडील एकनाथ गायकवाड यांनी या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केल्याने ही जागा काँग्रेसला मिळावी, अशी त्यांची मागणी होती. त्यामुळे या जागेसाठी त्या सुरुवातीपासून आग्रही होत्या. परंतु येथे शिवसेना ठाकरे गटाने अनिल देसाई यांना मैदानात उतरवले आहे. मात्र, किमान शेवटच्या क्षणी तरी यावर निर्णय होईल, अशी त्यांना आशा होती. परंतु मंगळवारी जागावाटप जाहीर होताच त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी थेट पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिले आहे. एवढेच नव्हे, तर त्यांनी थेट राष्ट्रीय सचिव के. सी. वेणुगोपाल यांच्याशीही दूरध्वनीवरून चर्चा केल्याचे समजते. त्यामुळे या मतदारसंघातील वाद वाढण्याची शक्यता आहे.

दक्षिण-मध्य मुंबईत काँग्रेसला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच येथे काँग्रेसला अनुकूल वातावरण असल्याचेही मानले जात होते. त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळेल, अशी आशा होती. त्यासाठी खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि वर्षा गायकवाड यांनीही पाठपुरावा केला होता. परंतु त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही. शिवसेनेने ज्या जागांची घोषणा केली, त्यातील जवळपास सर्वच जागा त्यांच्याकडे राहिल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्येही नाराजी असल्याचे संयुक्त पत्रकार परिषदेत दिसून आले.

काँग्रेस नेत्यांचे मौन

काँग्रेसच्या सांगली, भिवंडी यासह दक्षिण-मध्य मुंबई यासारख्या महत्त्वाच्या जागांवर काँग्रेसला पाणी सोडावे लागल्याने नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे संयुक्त पत्रकार परिषदेत दिसून आले. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वगळता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातही मीडियाला न बोलताच निघून गेले. त्यावरून काँग्रेस नेते जागावाटपावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता वाद संपलेला आहे. मीडियाने आता त्यावर बोलू नये, असे आवाहन पटोले यांनी यावेळी केले.

जिथे ताकद नाही, त्याच जागा मिळाल्या

महाविकास आघाडीच्या जागावाटपावर माजी मंत्री आमदार वर्षा गायकवाड यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. यावेळी त्यांनी ज्या जागांवर आम्ही निवडून येऊ शकतो, अशा जागा आम्हाला मिळालेल्या नाहीत, तर ज्या जागांवर आमची ताकद नाही, अशा जागा काँग्रेस पक्षाला दिल्या गेल्या, अशी टीका त्यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in