मुंबईतील मतदानाची टक्केवारी घटण्यामागे षडयंत्र; अंबादास दानवेंचा आरोप

लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यात घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत मुंबईत मतदानाची टक्केवारी घटली.
मुंबईतील मतदानाची टक्केवारी घटण्यामागे षडयंत्र; अंबादास दानवेंचा आरोप

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यात घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत मुंबईत मतदानाची टक्केवारी घटली. निवडणूक आयोगाचा गोंधळ व निष्काळजीपणा याला जबाबदार असून यामागे मोठे षडयंत्र आहे, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

राज्यात शेवटच्या टप्प्यात १३ मतदारसंघातील मतदान केंद्रांवरील गैरव्यवस्थेवर बोट ठेवत अंबादास दानवे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. अनेक मतदान केंद्रांवर पिण्याची पाण्याची गैरसोय, मतदान केंद्रावर मंडप नसणे, मोबाईल बंदीमुळे नागरिकांमध्ये नाराजी, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्या दोन बोटांवर निवडणूक अधिकाऱ्यांनी शाई लावली होती, याकडे लक्ष वेधताना दानवे म्हणाले, राज्याच्या निवडणूक आयोगांबाबत अशी स्थिती असल्यास सामान्य माणसाचे काय झाले असेल, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. तसेच निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची बदली का करण्यात आली? सत्ताधाऱ्यांना मदत करण्याची भूमिका निवडणूक आयोग व पोलिसांनी घेतली आहे का? याबाबत निःपक्षपातीपणे उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी दानवेंनी केली.

पुण्याची ओळख होतेय पबचे पुणे

पुण्यातील वाहन अपघातात दोन जणांच्या मृत्यू प्रकरणावरून दानवेंनी संताप व्यक्त केला. देशाच्या कानाकोपऱ्यातून पुणे येथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी येत असतात. त्यांना या पबमालकांकडून मद्यपान करण्याचे पॅकेज पुरविले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. पुण्यातील हायफाय रहिवासी वसाहत असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पब सुरू आहेत. विद्येचे हब म्हणून ओळख असलेल्या पुण्याची ओळख पबचे पुणे होऊ लागली असल्याची खंतही दानवे यांनी व्यक्त केली. पुण्यातील अपघातात पोलीस आयुक्तांनी ३०४ कलमऐवजी जाणीवपूर्वक ३०४ ए कलम लावले, असा आरोप करत याबाबत चौकशी करावी. तसेच विशाल अग्रवालवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही अंबादास दानवे यांनी केली.

भांडुपमधील पैसेवाटपाचे प्रकरण दडपले

मतदानापूर्वी भाजप व गद्दार उमेदवारांनी पैसे वाटले. भांडुपमध्ये अशी घटना उघड झाल्यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेथे धाव घेत प्रकरण मिटविल्याचा आरोपही दानवे यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in