
मुंबई : लाडकी बहीण योजनेचा वापर करून महायुती सरकारला बदनाम करण्याचा महाविकास आघाडी कार्यकर्त्यांचे षडयंत्र आहे, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील-दानवे यांनी केला आहे. महिलांनी या योजनेचे फॉर्म विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांकडे न देता थेट सरकारी यंत्रणेकडे द्यावेत, असे आवाहन रावसाहेब पाटील दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणूनच लढणार आणि जिंकणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या १८, १९ जुलै रोजी पार पडलेल्या दोन दिवसीय बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणूक ही महायुती म्हणून एकत्रितरीत्या लढण्याबाबत चर्चा करण्यात आली. विधानसभेच्या सर्वच्या सर्व २८८ जागांबाबत चर्चा झाली. कोणी किती जागा लढायच्या याचा निर्णय महायुतीतील घटक पक्षांचे वरिष्ठ योग्यवेळी घेतील, असेही दानवे यांनी नमूद केले.
मविआत सर्वांनाच मुख्यमंत्री बनण्याची घाई
मविआतील तिन्ही प्रमुख घटक पक्षांचे नेते, तर भावी मुख्यमंत्री म्हणून आपापल्या पक्षाच्या नेत्यांची नावे घेत आहेत. सर्वांनाच मुख्यमंत्री बनण्याची घाई झाली असून, आघाडीतील बिघाडीचे दर्शन आत्तापासूनच जनतेला घडत आहे. आघाडीतील ही बिघाडी काही आत्ताची नव्हे, तर सांगलीच्या जागेवरून मविआमध्ये झालेला वादंग लोक सभेवेळी दिसला आहेच, असेही दानवे म्हणाले.