पहिल्या पावसाच्या 'चिवनी' मच्छीला ग्राहकांची पसंती; २० ते २५ दिवस अधिक भाव!

उन्हाच्या कडाक्यातून सुटका व्हावी, यासाठी प्रत्येक जण पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात.
पहिल्या पावसाच्या 'चिवनी' मच्छीला ग्राहकांची पसंती; २० ते २५ दिवस अधिक भाव!

अरविंद गुरव/ पेण : उन्हाच्या कडाक्यातून सुटका व्हावी, यासाठी प्रत्येक जण पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. तसेच पहिला पाऊस सुरू झाला, की मच्छी खाणारे खव्वयैही 'वळगणीच्या मच्छी'ची आतुरतेने वाट पाहत असतात. जिल्ह्यात वळगणीची मिळणारी 'चिवनी' या नावची ही मच्छी फक्त पहिल्या पावसातच आणि फक्त २० ते २५ दिवसच मिळत असल्याने ही मच्छी भाव खाऊन जाते आणि खवय्यांची यावर झुंबड उडालेली बाजारात पहायला मिळत आहे.

पहिला पाऊस पडला की ही चिवनी मच्छी बाहेर येते. पावसाने खाडीला आलेल्या उधाणानंतर ही मच्छी मिळते. कोळी बांधव तसेच गावातील तरुण मंडळी खाडीभागात उक्षी लावून ही मच्छी पकडतात. चिवनी ही मच्छी पावसात आपली अंडी सोडण्यासाठी खाडी भागात येत असते. त्यामुळे जेव्हा मच्छी पकडली जाते त्यावेळी ती 'गाबोळीने' म्हणजे अंड्यानी भरलेली असते. मच्छी बाजारात वळगणीच्या चिवनी मच्छीला पावसाळ्यात प्रचंड मागणी असते.

लहान चिवनी मच्छी साधारण १०० ते २०० रुपये वाट्यावर दिली जाते. तर मोठी आणि गाबोळी असेल तर ती ४०० ते ५०० रुपये दरानेही ग्राहक घेत असतात. पहिल्या पावसात ही मच्छी मिळत असल्याने पावसात चिवनी मच्छी घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. ही मच्छी पाऊस सुरू झाल्यानंतर साधारण १५ ते २० दिवसच मिळत असल्याने मच्छीला मागणी जास्त असते. या वर्षी चिवने मागील वर्षी पेक्षा कमी प्रमाणात मिळत असल्याची खंत विठाबाई म्हात्रे या मासे विक्री करणाऱ्या महिलेने सांगितले. ही मासळी चवीला उत्तम असल्याने खवय्यांच्या पसंतीची आहे. या मच्छीचे केलेले कालवण तसेच तळलेली मच्छी ही भाकरी आणि भाताबरोबर खाण्यास उत्तम लागते. जिल्ह्यात आलेले पर्यटक देखील ही वळगणीची मच्छी खाण्यासाठी आतुर झालेले असतात.

चिवनी मच्छीला सध्या मोठी मागणी

रायगड हा जिल्हा समुद्र आणि खाडीने व्यापलेला आहे. या जिल्ह्यात पापलेट, सुरमई, मांदेली, बांगडा, कोलंबी, बोंबील यासारखे मासे नेहमीच मिळतात. पण पावसाळ्यात बोटी बंद असल्याने हे मोठे मासे कमी मिळतात. याशिवाय हे मासे बाहेरुन आणले जात असल्याने जास्त भावाने विकली जातात. त्यामुळे खाडी भागात मिळणाऱ्या वळगणीच्या चिवनी मच्छीला सध्या मोठी मागणी आहे.

logo
marathi.freepressjournal.in